सामाजिक
डी जे’ व ‘गुलाल’ ऐवजी फुलांच्या पाकळ्या उधळून लाडक्या गणरायाला निरोप द्यावा…
'सिंदखेड पोलीस ठाण्याचे सपोनि. सुशांत किनगे यांचे आवाहन'
लोकरवाडी /माहूर/प्रतिनिधी
डीजे व गुलालाऐवजी फुले किंवा फुलांच्या पाकळ्या उधळून लाडक्या गणरायाला निरोप देण्याचे आवाहन सिंदखेडचे सपोनि सुशांत किनगे यांनी केले असून पारंपारिक वाद्यांना प्राधान्य देवून मिरवणूका शांततेत पार पाडण्याचेही आवाहन त्यांनी केले आहे..
चालू वर्षात गणेशोत्सवावर अतिवृष्टीचे सावट असून दुष्काळजन्य परिस्थिती असली तरीही गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाचे आनंदात आणि जल्लोषात स्वागत केले आहे. तथापि आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देताना सिंदखेड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गणेश भक्तांनी गुलाला उधळण्याऐवजी फुले किंवा फुलांच्या पाकळ्या उधळाव्यात. तसेच मिरवणुकीत डीजे ऐवजी पारंपरिक वाद्ये वाजवावेत असे भावनिक आवाहन केले. दरम्यान विसर्जन मिरवणुकीत विघ्नसंतोषी प्रवृत्तींपासून सावध राहण्याबरोबरच कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवता मिरवणूक शांततेत पार पडावी. यासाठी गणेश मंडळांंनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करून यावर्षीचा गणेशोत्सव डीजेमुक्त आणि गुलालमुक्त करावा.
विशेष म्हणजे गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी मिरवणूकीत सर्रास गुलालाची उधळण केली जाते. त्यामुळे आरोग्यास धोका निर्माण झाल्याचे अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. त्यावर उपाय योजना म्हणून लाडक्या गणेशाला निरोप देतांना भक्तांनी गुलाल उधळणे टाळावे. त्यातील कचखडीचे बारीक कण व केमिकल कान, नाक, डोळे व तोंडात गेल्यास आरोग्यास अपायकारक ठरु शकते. हे सर्व टाळण्यासाठी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व गणेशभक्तांनी व गणेश मंडळांनी आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देताना गुलालाऐवजी फुले किंवा फुलांच्या पाकळ्या उधळाव्यात असे आवाहन सिंदखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक एस.जी. किनगे यांनी केले आहे…