वीज कंत्राटी कामगारांचे कदापिही शोषण होऊ देणार नाही…!
"माहूर येथील भारतीय मजदूर संघांच्या मेळाव्यात आ. केराम यांची ग्वाही"
माहूर,प्रतिनिधी
भारतीय मजदूर संघ जिल्हा नांदेड च्या वतीने भारतीय मजदूर संघ संलग्नित विविध शाखांच्या मेळाव्यात वीज कामगारांचे कदापिही शोषण होवून देणार नसल्याची ग्वाही आ. केराम यांनी माहूर येथील कपिलेश्वर मंदिर सभागृहात आपल्या अध्यक्षीय भाषणातून बोलताना दिली..
आ. भिमरावजी केराम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या मेळाव्यात गजानन टोकलवार यांनी श्रमिक गीत गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली. तद्नंतर श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडी, भारत माता आणि भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून भारतीय मतदारसंघाचे महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री श्रीपाद कुटासकर तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नागरिक संघाचे जिल्हाध्यक्ष बाकलीवाल, एल.आय.सी. एन. ओ. आय. बी. चे अनिल जोशी, बांधकाम कामगार महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री संजय सुरोशे, कंत्राटी वीज कामगार महासंघाचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र दिनकर, वीज कामगार महासंघाचे झोन अध्यक्ष गिरीश डोणगावकर, बांधकाम कामगार महासंघाचे नांदेड जिल्हा सचिव गजानन टोकलवाड, वीज कामगार महासंघाचे झोन सचिव प्रमोद देशमुख, वीज कामगार महासंघाचे परभणी मंडळ सचिव रमेश उन्हाळे, संदीप धर्माधिकारी तसेच कापसे ताई यांची उपस्थिती होती…
दरम्यान भारतीय मजूर संघाच्या विस्तारासाठी नव्या शाखा निर्माण करणे यासह जुन्या शाखांना प्रत्यक्ष भेटी देऊन बळकटी देणे, सर्व वर्गातील कामगारांच्या प्रश्नांवर आवाज उठवणे त्यासाठी केंद्रापर्यंत पाठपुरावा करणे, सर्व प्रकारच्या कंत्राटी भरतीचा विरोध करणे, कंत्राटींना कायम करण्यासाठी पाठपुरावा करणे, वीज कंत्राटी कामगारांना त्यांचे मूळ वेतन मिळवून देण्यासाठी ऊर्जा मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करणे, वेतनाची परस्पर लूट करणाऱ्या कंत्राटदारांना दंडित करणे, अशा विविध विषयावर या बैठकीत सखोल चर्चा झाली.
यावेळी कंत्राटदाराकडून कंत्राटी कामगारांचे होत असलेले अमानुष शोषण आणि या संबंधाने उपस्थित कामगारांनी आ. भीमरावजी केराम यांच्यासमोर मांडलेली परिस्थिती पाहून संपूर्ण सभागृह आवाक झाले. वीज कंत्राटी कामगारांचे शोषण कंत्राटदार आणि अधिकारी यांच्या संगनमताने होत आहे. त्यामुळे कंत्राटी कामगारांवर उपासमारीची आणि वेठबिगारीची वेळ येत आहे अशा तक्रारी सभागृहात मांडण्यात आल्या. एवढेच नव्हे तर बांधकाम कामगारांचेही प्रश्न गंभीर आहेत. कामगार कल्याणाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नसून त्या दलाला मार्फत वाटल्या जातात. परिणामी खरे कामगार त्यापासून वंचित राहतात. याकडे आमदार महोदयांचे लक्ष वेधून न्याय द्यावा अशी विनंती कामगारांकडून करण्यात आल्यानंतर कामगार क्षेत्रामध्ये होत असलेली लूटमार व शोषण यावर मी तुमच्या पाठीशी आहे. कुणीही घाबरायची गरज नाही. तुम्ही काम करता त्याचा मोबदला तुम्हाला मिळाला पाहिजे. यासाठी मी मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करीन. तर प्रसंगी मंत्री महोदयापर्यंत हा विषय नेवून न्याय देण्याचा प्रयत्न करीन.. असे स्पष्ट शब्दांत आश्वासन आ. केराम यांनी उपस्थित कामगार वर्गाला दिले…
तर भारतीय मजदुर संघ राष्ट्र विचारांची संघटना आहे. राष्ट्र प्रथम, उद्योग हित द्वितीय आणि कामगार हित तृतीय अशा त्रिसूत्रीवर चालणारी ही एकमेव प्रामाणिक योगदान देणारी निस्वार्थपणे काम करणारी संघटना असून या संघटनेसाठी आपणही मेहनत घेत आहात. हे काम असेच वाढवावे आणि जगभरात ही संघटना क्रमांक एक वर राहील यासाठी प्रयत्न करावेत. तुमच्या कुठल्याही प्रश्नाला आवाज देण्यासाठी मी कोणत्याही वेळी तुमच्या सोबत येण्यास तयार असल्याचे आश्वासन प्रमुख मार्गदर्शक श्रीपाद कुटासकर यांनी आपल्या मनोगतात दिले…
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री संजय सुरोशे महामंत्री बांधकाम कामगार महासंघ महाराष्ट्र प्रदेश यांनी प्रयत्न केले. विज कामगार महासंघाचे झोन सचिव प्रमोद देशमुख यांनी जानदार सूत्रसंचालन करून कार्यक्रमात रंगत आणली.