बोअरवेल मशीनवाहक ट्रकची दुचाकीस जोराची धडक ; भिषण धडकेत दुचाकीवरील दोघे गंभीर…
"दुचाकीवरील दोघांचे पाय चेंदामेंदा ; आसोली फाट्यानजीकची घटना"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
माहूर किनवट राष्ट्रीय महामार्गावरील आसोली फाट्यावर बोअरवेल मशीनवाहक ट्रकने कामावरून परत येत असलेल्या दुचाकीस जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील दोन्ही युवक गंभीर जखमी झाल्याची घटना आज दि. १३ रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली…
माहूर तालुक्यातील कसारपेठ (आश्रमशाळा परिसर) येथील लिंगू शंकर आडे वय २८ व संजय तुकाराम येरमे वय २३ वर्षे हे दोन युवक आज सकाळी त्याची दुचाकी क्र. एम.एच. २६ बी.आर. ६३०९ या दुचाकीने माहूर येथे काही कामानिमित्त गेले होते. तेथून परत येत असताना सकाळी ७ वा. च्या सुमारास माहूर किनवट राष्ट्रीय महामार्गावरील आसोली फाट्यानजीक वाई बाजार कडून माहूरकडे जात असलेल्या बोअरवेल मशीन वाहक ट्रकने त्यांना जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील दोन्ही युवकांच्या उजव्या पायाचा अक्षरश: चेंदामेंदा झाला असून मांडीच्या हाडाच्या ठिक-या उडाल्याची परिस्थिती आहे…
दरम्यान दोन्ही जखमींना माहूरच्या ग्रामीण रूग्णालयात नेले असता येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. विपीन बाभळे यांच्यासह त्याच्या सहका-यांनी प्राथमिक उपचार करून दोन्ही जखमी युवकांना यवतमाळच्या शासकीय रूग्णालयाकडे रेफर केले असल्याचे सांगण्यात आले आहे… वृत्त लिहीपर्यंत घटनेसंदर्भात सिंदखेड पोलीस ठाण्यात कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाला नसल्याने याबाबतची अधिक माहिती प्राप्त होवू शकली नाही…

