राजकिय
माहूर तालुक्यातील दिग्गजांचे राजकारण ‘अस्थिर’तेच्या गर्तेत..!!
"सेनेचे झाले तुकडे, राष्ट्रवादी दुभंगली..! ; माकप दिसतेय आंदोलनापुरती, काँग्रेसही पांगलेली..!!"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
(बाबाराव कंधारे)
कार्यकर्त्यांपासून ते पुढा-यांपर्यंत यशाची एकमेव पायरी असलेल्या राजकारणात माहूर तालुक्यातील अनेक दिग्गज राजकीय पुढा-यांचे पुढील राजकीय भवितव्य अस्थिरतेच्या गर्तेत असल्याचे दिसून येत असून येत्या काळात तालुक्यातील विविध पक्षांच्या राजकीय पटलावर मोठे उलटफेर होवून मोठ्या राजकीय घडामोडी घडणार असल्याचे भाकीत राजकीय जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे..
एकेकाळी दिग्गज व धुर्त किंबहुंना ‘खणखणीत’ राजकीय पुढा-यांनी गजबजलेल्या माहूर तालुक्यात अनेक निर्णायक पुढा-यांची मोठी फळी होती. अगदी मागील काही वर्षांपर्यंत शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप व माकपाच्या नेतेमंडळीची आपापल्या कार्यक्षेत्रावर प्रभावी व तेवढीच निर्भेळ पकड होती. परंतू ती पकड आजच्या परिस्थितीत कितपत घट्ट असेल..? याबाबत आज सांगणे कठीण असल्याचे दिसत असून सभोवतालची राजकीय परिस्थिती व मागील काही काळापासून राज्याच्या राजकारणातील घडत असलेल्या अन:पेक्षित घटनांमुळे भल्याभल्यांच्या राजकारणाचा अक्षरश: कचरा झाल्याचे उभ्या महाराष्ट्राने अनुभवले आहे. अशा परिस्थितीत माहूर तालुक्यातील राजकारण स्थिर असल्याचे दिसून येत होते. परंतू वाळलेल्या गवतावर विस्तवाची ठिणगी पडावी अशी ठिणगी माहूर तालुक्याच्या राजकारणातही पडेल..! किंबहूंना पडली..!! अशीच काहीशी परिस्थिती तालुक्यातील राजकारणाच्या वर्तमान परिस्थितीवरून दिसून येत असून ‘मैं बडा’ च्या “फुशारक्या” मारणा-या अनेक पुढा-यांचे राजकारण केवळ नावापुरतेच नाही तर सध्याच्या राजकारणाची अवस्था कच-यापेक्षाही वाईट झाल्याची बोलकी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांकडून दिली जात आहे..
याचे मुख्य कारण म्हणजे तालुक्यातील महाविकास आघाडीच्या शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी या तिनही घटकपक्षांची अवस्था मालक ठेवत नाही अन् चोर नेत नाही” अशीच अत्यंत बिकट बनली असून शिवसेनेतील ठाकरे गट व शिंदे गट असे दोन गट एकमेकांसमोर दंड थोपटून उभे ठाकल्याने एकेकाळी संपुर्ण तालुक्यावर लक्षणीय पकड असलेल्या सेनेचे बळ दोन तुकड्यांत विभागले आहे.. तर मागील काही काळापासून राष्ट्रवादीतील अंतर्गत कलहामुळे किंबहूंना “मी ही कमी नाही” या ‘न्युनगंडातून’ अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर येवून राष्ट्रवादी केवळ ‘फट’ नाही तर मोठे ‘भगदाड’ पडल्याचे एकंदरीत चित्र आहे. अशा परिस्थितीत मतदार संघावर सलग तिन पंचवार्षिका अधिराज्य गाजवणारे माजी आमदार प्रदिप नाईक एखादी ‘जादुई छडी’ फिरवून पक्षात पडलेले भगदाड बुजवतात का पुन्हा एकदा विद्यमान आमदार भिमरावजी केरामांचा मार्ग ‘सुकर’ करतात हा येणारा काळच ठरवेल..
तालुक्यातील काँग्रेस पक्षाचा विचार केल्यास “माहूरचे राजकारणही दिल्लीप्रमाणेच” असा काँग्रेसवासीयांच्या कार्यप्रणालीवर जनताजनार्दन उघड आरोप करता असून ‘आपल्याला चान्स मिळणे कठीण..!’ या कार्यकर्त्यांत रूजलेल्या भावनेतून काँग्रेसची मंडळीही पांगलेलीच दिसत असल्याने आगामी काळात पक्षात स्थैर्य टिकवून ठेवण्याचे पक्षातील दिग्गजांसमोर कडवे आव्हान उभे ठाकले आहे.. राहिला प्रश्न ‘वंचित’ चा..! तर तालुक्यात वंचितकडे प्रभावी चेहरा नसल्याने सध्यातरी वंचितला ‘वंचितच रहावे लागणार आहे.. अशावेळी “मोडेल पण वाकणार नाही” ची भुमिका घेवून आंदोलनाच्या माध्यमातून अचानकपणे समोर येणारा ‘माकप’ आपल्या ध्येयधोरणांत उजवा वाटत असला तरी संख्याबळाअभावी केवळ आंदोलनापुरतेच अस्तित्व टिकवून असल्याचे कुणीही नाकारू शकत नाही…
“एकंदरीतच माहूर तालुक्याच्या राजकीय पटलाला निरखून पाहिल्यास “सेनेचे झाले तुकडे, राष्ट्रवादी दुभंगली..! ; माकप दिसतेय आंदोलनापुरती, काँग्रेसही पांगलेली..!!” असेच काहिसे चित्र माहूर तालुक्यातील राजकारणात दिसून येत असल्याने तालुक्यातील एकेकाळच्या दिग्गजांचे राजकारण सध्यातरी अस्थिरतेच्या गर्तेत असल्याचेच राजकीय जाणकारांकडून उघडपणे बोलले जात आहे…”

