क्राइम
दोन महिण्यांपुर्वी बेपत्ता झालेल्या गोकुंद्याच्या ‘त्या’ तरूणाचा मृतदेह सापडला…
"किनवट माहूर राष्ट्रीय महामार्गावरील राजगड नजीक सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
दोन महिण्यांपुर्वी किनवट गोकुंदा येथूून बेपत्ता झालेल्या ‘त्या’ तरूणाचा मृतदेह राजगड नजीक महामार्गालगत खोदलेल्या नालीत सडलेल्या अवस्थेत सापडला असूून दोन महिण्यांपासून दुचाकीसह बेपत्ता झालेल्या तरूणाचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे..
किनवट तालुक्यातील गोकुंदा येथील सचिन गंगाधर आरपेल्लीवार वय २० वर्षे हा तरूण २७ फेब्रुवारी रोजी कामासाठी जात असल्याचे सांगून घराबाहेर पडला होता. परंतू तो घरी परतला नसल्याने नातेवाईकांसह किनवट पोलीसांकडूनही त्याचा शोध सुरू होता. दरम्यान काल रविवार (दि. २७ एप्रिल) रोजी सकाळी किनवट माहूर राष्ट्रीय महामार्गावरील राजगड नजीक महामार्गालगतच्या एका शेतात ट्रॅक्टरने नांगरणीचे काम करीत असलेल्या ट्रॅक्टरचालकाला रस्त्याच्या कडेला दुचाकी क्र. एम.एच.२९ बी.एस. ८६०६ या दुचाकीसह एका तरूणाचा मृतदेह दिसला.. त्यावेळी किनवट पोलीसांना कळवल्यानंतर बीट जमादार संग्राम मुंडे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.. त्यावेळी पोलिसांनी मिळालेल्या ‘मिसिंग’ नोंदीनुसार तसेच कपडे व मोबाईलवरून मृताची ओळख पटवली… यावेळी नातेवाईकांनी मृतकाची ओळख पटविल्यानंतर मृत व्यक्ती सचिन आरपेल्लीवार असल्याचे निश्चित झाले…
मयत तरूणाचा मृत्यू पाच ते सहा दिवसांपुर्वी झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत असून हा घात की अपघात याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत… या प्रकरणी किनवट पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून प्रकरणाचा तपास किनवट पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक सुनील बिर्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.काँ. संग्राम मुंडे हे करीत आहेत….

