सुट्टीच्या दिवशी कार्यालय चालू ठेवण्याच्या ‘सिईओ’ च्या आदेशाला माहूरच्या गटविकास अधिका-यांकडून केराची टोपली….
"सि.ई.ओ. मेघना कावली यांचा आदेश धुडकावत शनीवार व रविवारला एकही अधिकारी कर्मचारी कार्यालयात नाहीच..!"


(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)


किनवट/माहूर
जिल्हा वार्षिक नियोजन बैठक आणि व्हीजेएनटी समितीच्या दौ-याच्या अनुषंगाने लेखा जोख्याचा अहवाल तयार करण्यासाठी पं.स. कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी दि. ४ व ५ रोजी सुट्टीच्या दिवशीही कार्यालय चालू ठेवण्याच्या ‘सिईओ’ च्या आदेशाला माहूर पं.स. च्या गटविकास अधिका-यांकडून केराची टोपली दाखवण्यात आली असून सि.ई.ओ. चा आदेश धुडकावत काल व आज पं.स. कार्यालयात एकही अधिकारी कर्मचारी कार्यालयात हजर नसल्याने माहूर पं. स. कार्यालयाचा मनमानी कारभार चव्हाट्यावर आला आहे…

नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी दि. 3 रोजी आदेश काढून ‘जिल्हा वार्षिक योजना बैठक’ तसेच ‘व्ही.जे.एन.टी.’ समितीच्या दौऱ्यानिमित्त दौऱ्यात सादर करण्यात येणाऱ्या लेखा जोख्याचा अहवाल तयार करण्यासाठी पंचायत समिती मधील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शनिवार व रविवार रोजी कार्यालयात उपस्थित राहून सर्व कागदपत्रांची पडताळणी करत अहवाल तयार ठेवण्यासाठी पत्र निर्गमित केले होते. परंतू असे असतानाही काल शनिवार दि. 4 व आज दि. 5 रोजी एकही अधिकारी व कर्मचारी उपस्थित नसून कुणीही अहवाल तयार करताना दिसला नाही. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या आदेशाला अधिकारी कर्मचाऱ्यांनी केराची टोपली दाखवल्याचा लाजिरवाणा प्रकार समोर आहे..


दरम्यान दि. 3 रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी पत्र काढून सर्व पंचायत समिती जिल्हा नांदेड येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सुट्टीच्या दिवशी कार्यालय चालू ठेवण्याकरिता सामान्य प्रशासन विभागाच्या निर्णयाचा संदर्भ देत सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण-2025/प्र.क्र.7/र.व.का-1/दिनांक 13.01.2025. नुसार आगामी जिल्हा वार्षीक योजना बैठकीचे अनुषंगाने तयारी करणेस्तव व अहवाल सादर करणेसाठी तसेच व्ही. जे. एन. टी. कल्याण समितीच्या नियोजीत दौऱ्यांचे अनुषंगाने आस्थापनेविषयी व योजना विषयी माहिती संकलीत करण्यासाठी दि 04.10.2025 शनिवार व 05.10.2025 रविवार सुट्टीच्या दिवशी नियमीत कार्यालय सुरु ठेवण्यात यावे. तसेच या विषयी सर्व संबधीत अधिकारी कर्मचारी कार्यालयात हजर राहतील याची दक्षता घ्यावी. असे ठणकावले होते. तर यात कोणताही हलगर्जीपणा होणार नाही यांची दक्षता घ्यावी असे कडक शब्दात आदेश निर्गमित केले होते..
परंतू ‘त्या’ आदेशाची प्रत अचानक हाती लागल्याने कार्यालयात जाऊन पाहणी केली असता एकही अधिकारी कर्मचारी उपस्थित नसल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले असून कार्यालयातील सर्व दरवाजांना कुलूप लावलेले चित्र आहे.. तर यासंबंधी गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता ते नॉट रिचेबल असून मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या आदेशाला अधिकारी कर्मचाऱ्यांनी केराची टोपली दाखवल्याचे सिद्ध झाले आहे.. दरम्यान याप्रकरणी इलियास बावानी यांनी लेखी तक्रार दाखल केली असून या गंभीर प्रकारावर नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली ह्या माहूर पंचायत समितीच्या दांडीबहाद्दर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे…..










