शैक्षणिक
“शाळा सरकारी…! पण् खाजगीपेक्षाही भारी..!!” वाई बाजार च्या जि. प. शाळेत दहाव्या वर्गासाठी शिक्षणाधिका-यांची मान्यता….
"पुढील प्रक्रियेसाठी शिक्षण उपसंचालकांकडे प्रस्ताव सादर.."


(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
तत्कालीन केंद्रीय मुख्याध्यापक व गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील समन्वयाच्या अभवाने मागील सहा महिण्यांपासून प्रलंबित असलेली वाई जि. प. शाळेतील इयत्ता दहावीची वर्गवाढ अखेर शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून सकारात्मक प्रतिसाद देत निकाली निघाली असून दहावीच्या वर्गाला शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून मान्यता देत पुढील प्रक्रियेसाठी मान्यतेसाठीचा प्रस्ताव शिक्षण उपसंचालकांकडे पाठवल्याने शिक्षणप्रेमींकडून शिक्षण विभागाचे आभार व्यक्त होत आहेत..

माहूर तालुक्यात जिल्हा परिषदेची सर्वात मोठी शाळा म्हणून सुपरिचित असून एकेकाळी इयत्ता सातवीपर्यंतचे वर्ग असलेल्या शाळेत आजमितीस दहावीच्या वर्गालाही मान्यता मिळाली आहे.. दरम्यान तत्कालीन मुख्याध्यापक व गटशिक्षणाधिकार्यालयाचा ताळमेळ नसल्यामुळे प्रलंबित असलेल्या या विषयी नांदेड जि.प. चे शिक्षणाधीकारी (माध्य.) यांनी त्यांच्या कार्यालयाचे पत्र ४६५८ जा.क्र. जिपनां/शि.अ./स्वयंअर्थ/शा./मा.4 शिक्षण विभाग नांदेड दि. १ ऑक्टोबर २०२५ अन्वये शिक्षण उपसंचालक लातूर यांचेकडे पुढील मान्यतेसाठी प्रस्ताव पाठवला असून येत्या काही दिवसात शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून देखील यावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे… त्यामुळे वाई बाजार येथील जि.प. कें. प्रा. शाळेतील दहावीच्या वर्गाच्या मान्यतेचा विषय तुर्तास निकाली निघाल्याचे दिसून येत असून शिक्षण विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने शिक्षण विभागाचे ग्रामस्थांसह शिक्षणप्रेमी मंडळींकडून आभारही व्यक्त होत आहे…
“विशेष म्हणजे केवळ वाई बाजारच नव्हे तर ही शाळा आसपासच्या खेडोपाड्यांच्या पालकवर्गाच्या पहिल्या पसंतीची शाळा आहे. अत्यंत दर्जेदार शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या या शाळेत इयत्ता पहिली ते 10 वी पर्यंत एकूण चारशे साठ विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यापैकी तब्ब साठ विद्यार्थी दररोज बाहेरील खेड्यापांड्यांवरून येणे जाणे करतात.. तथापि, सरकारी असली तरीही येथील दर्जेदार शिक्षणाचा स्तर पाहता गोरगरीबांच्या लेकरांना येथील जि.प. केंद्रीय शाळेतच इयत्ता दहावीपर्यंतचे दर्जेदार शिक्षण उपलब्ध व्हावे या उदात्त हेतूने गावातील शिक्षणप्रेमीं मंडळींकडून शिक्षणविभागाला अक्षरश: जेरीस आणून पाठपुरावा करताना पुर्वी सातवीपर्यंत असलेल्या शाळेत आजमितीस दहाव्या वर्गाचीही मान्यता मिळविली आहे… तर यापुढेही इयत्ता अकरावी व बारावीचेही वर्ग वाढीसाठी गावातील शिक्षणप्रेमी मंडळींनी चंग बांधला आहे…










