खाजगी शिक्षण संस्थांच्या छुप्या विरोधानंतरही माहूर तालुक्यातील जि.प.च्या तब्बल 27 शाळेत वर्गवाढ…
"23 शाळेत पाचवा, 2 शाळांत आठवा तर 2 शाळेत नववीच्या वर्गांना मान्यता"
(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
खाजगी शिक्षण संस्थांनी छुपा विरोध केल्यानंतरही माहूर तालुक्यातील जि.प.च्या तब्बल २७ शाळांत नैसर्गीक वर्गवाढीची मान्यता नांदेड जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिका-यांनी दिली असून तालुक्यातील अनेक सरकारी शाळेत वर्गवाढ होवून विद्यार्थ्यांना पुढील वर्गाचे शिक्षण प्राप्त होणार असल्याने शिक्षण विभागाच्या या निर्णयाचे स्वागत शिक्षणप्रेमींकडून होत आहे….
बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिनियम २००९ अनुसार प्राथमिक शाळेत इयत्ता ५ वीचा वर्ग व उच्च प्राथमिक शाळेत इयत्ता ८ वी चा वर्ग जोडणे..(महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रिडा विभाग शासन निर्णय क्र. प्रा.शा.२०२३/प्र.क्र.-९८/एसएम-5 दि. १५ मार्च २०२४ नुसार) मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांचे वर्गवाढ आदेश जा.क्र. ४०२९ दि. ६ जून २०२४ अन्वये…
माहूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शिऊर, अंजनखेड, आसोली, मेट तांडा, पडसा नवा, उमरा तांडा, चोरड, जुनापानी, लसनवाडी, रूपला नाईक तांडा, दिगडी कुत्तेमार, गुंडवळ तांडा, जग्गू नाईक तांडा, लखमापूर तांडा, नखेगाव, केरोळी, मालवाडा, शेकापूर, सावरखेड, चौफुली, कोलामखेड, भिमपूर व मुंगशी या २३ ठिकाणच्या जि.प.च्या शाळेत आता इयत्ता ५ वी चा वर्ग वाढ करण्यात आला आहे…
तर जि.प. शाळा मौजे तुळशी तांडा व दहेगाव या ठिकाणी इयत्ता आठवीचा वर्ग वाढ करण्यात आला आहे… त्याचबरोबर प्राथमिक शाळा इवळेश्वर व जि.प.कें.प्रा. शाळा वाई बाजार येथे नवव्या वर्गाला वर्गवाढ देण्यात आली आहे…
एकंदरीतच वरील सर्व ठिकाणी आवश्यकतेनुसार वर्गवाढ देवून विद्यार्थ्यांना शिक्षण व्यवस्था पुरवण्याच्या स्वागतार्ह निर्णयाचे शिक्षणप्रेमी मंडळींकडून स्वागत करण्यात येत असून शिक्षण विभागाचे पालक वर्गातून आभार मानल्या जात आहेत….