“वाई बाजार येथील वसंतराव नाईक विद्यालयाच्या कर्माप्रमाणे दहावीचा निकालही कुपोषितच..!!
"इतर शाळांचा निकाल शंभर टक्क्यांकडे असताना वसंतराव नाईक विद्यालयाचा निकाल मात्र लाजिरवाणा..!!"
(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
(बाबाराव कंधारे)
वाई बाजारच्या शैक्षणिक इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद व्हावी अशी गौरवास्पद कामगीरी मागील काही वर्षात करीत असलेल्या वाई बाजार येथील वसंतराव नाईक विद्यालयाचा चालू वर्षातील दहावीचा निकाल अगदी कर्मचा-यांच्या कर्माप्रमाणे कुपोषितच लागला असून निकालाबाबत माध्यम प्रतिनिधींनी शाळा प्रशासनाकडे विचारणा केली असता थातूरमातूर स्वरूपाची माहीती मिळत आहे. तर संपूर्ण शाळेतून केवळ दोनच विद्यार्थी पास झाल्याच्या पार्श्वभुमिवर ही बाब शाळेसाठी अत्यंत लाजीरवाणी असल्याच्या तिखट प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून उमटत आहेत…
…मागील दोन वर्षाच्या काळात कोरोनामुळे शाळा बंद होत्या याचा सर्वात जास्त फायदा त्यावेळी येथील वसंतराव नाईक विद्यालयाच्या आयतखाऊ प्रशासनाला झाल्याचे जवळपास स्पष्टच आहे.. कारण मागील दोन वर्ष कोरोनाच्या पार्श्वभुमिवर शाळा बंद असल्याकारणाने शाळा प्रशासन मजेत होते. तर दोन वर्षानंतर प्रथमच यावर्षी शाळा सुरू होवून विद्यार्थ्याच्या ऑफलाईन परिक्षाही घेतल्या.. घेतलेल्या परिक्षेत परिक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांच्या पासींगची शंभरटक्के गँरेन्टी घेवूनच परिक्षाही घेतल्या गेल्या.. परंतू “गेले ते दिवस अन् राहील्या त्या आठवणी” याची तंतोतंत प्रचिती देताना वसंतराव नाईक विद्यालयाने दहावीच्या निकालात सर्वांच्याच तोंडचे पाणी पळवले आहे…
“यातही अतिरेक म्हणजे मुख्याध्यापक महोदय हे सदैव नांदेड मिटींगसाठी जातात…आजही (दि.२० जून) गेले असल्याचे समजले… आता निकाल विचारल्यानंतर ‘बाबू’ जी देखील अज्ञातवासात गेल्याचे समजले… मग अनेक शिक्षकांना निकाल विचारल्यानंतर कुणी २ तर कुणी ३ विद्यार्थी पास झाल्याचे सांगत आहेत…! आता कळीचा मुद्दा असा की दहावीच्या परिक्षेसाठी अर्ज भरले ११, प्रत्यक्ष परिक्षेस बसले ८ व पास झाले २ विद्यार्थी…… असा एकंदरीत शाळेचा तसेच शाळा प्रशासनाचा ‘उंठावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार’ समोर आल्यानंतरही काही निर्लज्ज कर्मचा-यांकडून आमच्या पगारी काय बंद होतील काय? असे निर्लज्जपणाचे वक्तव्य गावात फिरताना शाळेच्या एका कर्मचा-याने केले आहे……एकंदरीतच ही बाब शिक्षणप्रेमींसाठी एक सणसणीत चपराक असून माहूरच्या शिक्षण विभागासोबतच शिक्षणाधिकारी नांदेड यांनीदेखील याची दखल घेणे गरजेचे बनले आहे……