क्राइम
पैशांच्या वादातून तेलंगणातील महिलेचा खून, मृतदेह किनवट तालुक्यातील सारखणी घाटात आणून टाकला…
सारखणी जंगलात आढळलेल्या तरुणीच्या मृतदेहाचा अखेर उलगडा ; दोघे अटकेत..

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
मकरसंक्रांतीच्या दिवशी सारखणी घाटातील मुख्य महामार्गाशेजारी आढळून आलेल्या ‘त्या’ महिलेच्या मृतदेहाचा अखेर उलगडा झाला असून तेलंगणातील एका 38 वर्षीय महिलेचा ‘तो’ खुन पैशाच्या वादातून होवून आरोपींनी मृतदेह किनवट तालुक्यातील सारखणी घाटात आणून टाकल्याची कबूली अटकेत असलेल्या दोन आरोपींनी दिल्याची माहिती पोलीस सुत्रांकडून प्राप्त झाली आहे..
काल दि. १४ जानेवारी रोजी ऐन मकरसंक्रांतीच्या दिवशी सिंदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे सारखणी परिसरात राष्ट्रीय महामार्गालगतच्या घाटात एका तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. घटनास्थळावरील प्रत्यक्ष परिस्थितीनुसार सदर तरुणीचा खून करून मृतदेह येथे आणून टाकण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. दरम्यान सदरचा मृतदेह हा तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यातील इमराना जबीन वय 38 वर्षे हिचा असल्याचे निष्पन्न झाले आहे…
प्राप्त झालेल्या माहितीनुसार, तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यातील मौजे पित्तलवाडा या गावची इमराना जबीन ही मागील दोन महिन्यांपासून तिची बहीण समीना यास्मिन हिच्याकडे मौजे दासनापूर जि. आदिलाबाद येथे राहत होती. तिने मागील एक वर्षापूर्वी इंद्रवेल्ली येथील फारुख खान याला आपल्या नावाने सुमारे पाच लाख रुपये, तसेच सोन्याचे दागिने गहाण ठेवून आणखी सुमारे चार लाख रुपये दिले होते. दरम्यान, इमरानाचा विवाह ठरल्याने तिने फारूख खान याच्याकडे पैसे परत मागितले असता फारुख खान याने टाळाटाळ सुरू केली. तथापि, दि. 25 नोव्हेंबर 2025 रोजी फोनवरून पैसे मागितले असता त्याने स्पष्ट नकार दिल्याने इमराना मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाली. व दि. 26 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी तिचा मोबाईल अचानक बंद झाला. तसेच ती राहत असलेले घर कुलूपबंद अवस्थेत आढळले. दरम्यान तिची अॅक्टिव्हा दुचाकी घरासमोरच उभी दिसून येत असल्याने अखेर मावळा पोलीस ठाण्यात तिची बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.
दरम्यान तिच्या बेपत्ता असल्याचा तपास सुरू असतानाच ऐन मकरसंक्रांतीच्या दिवशी दि. 14 जानेवारी 2026 रोजी मावळा पोलीसांनी मोहम्मद फारुख व रमेश या दोघांना ताब्यात घेवून चौकशी केली असता त्यांनी कबुली दिली की, 26 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री ते दुचाकीवरून पित्तलवाडा येथे गेले होते. पैशांच्या कारणावरून इमराना जबीन व फारुख यांच्यात वाद झाला आणि त्याच वादातून तिचा खून करण्यात आला.. त्यावेळी खून केल्यानंतर फारुख याने कार भाड्याने घेऊन इमरानाचा मृतदेह आदिलाबाद येथून इचोडा व सोनाळा मार्गे किनवटकडे आणल्यानंतर किनवटहून सारखणीकडे आणला. व सिंदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात रस्त्याच्या कडेला दगड व मातीने झाकून मृतदेह टाकून दिल्याची माहिती आरोपींनी दिली…
तो मृतदेह काल दि. 14 जानेवारी रोजी आढळून आल्यानंतर तेलंगणातील मावळा पोलीसांसह सिंदखेड पोलीस तसेच तहसीलदार व पंचांच्या उपस्थितीत घटनास्थळ पंचनामा करण्यात आला. तसेच घटनास्थळीच ‘रिम्स’ रुग्णालय आदिलाबाद येथील डॉक्टरांच्या पथकाकडून शवविच्छेदन करून सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.. तसेच मृतदेह सिंदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत आढळून आल्याने या प्रकरणाची सविस्तर माहिती मावळा पोलीस ठाण्याकडून अधिकृत पत्राद्वारे सिंदखेड पोलिसांना देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहितच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल झाल्याचे पोलीसांनी सांगितले आहे…





