जि. प. पीएमश्री हायस्कूल, वाई बाजार येथे ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ उत्साहात साजरा..
'थोर शास्त्रज्ञ सर सी.व्ही. रमन यांचे शोध व वैज्ञानिक दृष्टिकोणाचे स्मरण'

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
वाई बाजार येथील जिल्हा परिषद पीएमश्री हायस्कूल मध्ये ८ फेब्रुवारी रोजी ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ मोठ्या उत्साहात आणि वैज्ञानिक वातावरणात संपन्न झाला.थोर शास्त्रज्ञ सर सी. व्ही. रामन यांच्या शोधाचे स्मरण आणि विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मान्यवरांच्या हस्ते सी.व्ही.रामन यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.शाळेचे मुख्याध्यापक अजय राठोड यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले व प्रास्ताविकातून विज्ञानाचे मानवी जीवनातील महत्त्व विशद केले. या सोहळ्याचे अध्यक्षपद शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमजद पठाण यांनी भूषवले. तसेच प्रमुख वक्ते मिलिंद कंधारे यांनी आपल्या ओघवत्या भाषणातून विज्ञानातील गमतीजमती सांगून विद्यार्थ्यांना प्रेरित केले.तसेच या कार्यक्रमाच्या मार्गदर्शनामध्ये गुरुलिंग वाळके व श्रीमती अनुराधा चौधरी यांनी मोलाचे सहकार्य केले.
“मनोगताच्या सत्रात सारंग साळुंके यांनी विज्ञानाची कास धरून प्रगती करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. या उपक्रमात इतरही काही उपक्रमांची संलग्नता होती.जसे की, श्रीमती अर्चना गोल्हार यांच्या संकल्पनेतून तसेच अनुराधा चौधरी यांच्या सहकार्यातून रांगोळी, निबंध आणि पोस्टर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. पोस्टर स्पर्धा ही विशाल कान्नव यांच्या मार्गदर्शनाखाली तर निबंध स्पर्धा ही जाफर सर यांच्या नियोजनाखाली पार पडली…


विशेष आकर्षण ठरलेल्या विज्ञान मॉडेल प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी सौर ऊर्जा, वॉटर कुलर आणि विविध वैज्ञानिक प्रयोगांचे सादरीकरण केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे बहारदार आणि नेटके सूत्रसंचालन मुनेश्वर थोरात यांनी केले. त्यांनी आपल्या ओघवत्या शैलीत विज्ञानावर आधारित कोडी आणि चारोळ्या सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. तसेच कार्यक्रमाची सांगता प्रशांत धडेले यांनी मानलेल्या आभार प्रदर्शनाने झाली. यावेळी किशोर कांबळे, गीता कुमरे, समुंदरा सावंत, एलेबोईनवाड सर, सुशील गावंडे या अध्यापकांनी मोलाचे सहकार्य केले….





