ईतर
माहूरच्या सहकारी सुतगिरणीचे नेमके काय .? माहूरच्या विकासाचे स्वप्न की फसवणुकीचा खेळ..?”
"जनता संभ्रमात ; विकासाचे स्वप्न पाहणा-यांकडून पारदर्शकतेची मागणी..!"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
(बाबाराव कंधारे)
किनवट/माहूर
तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून प्रस्तावित असलेली सहकारी ‘सुतगीरणी’ आता चर्चेचा विषय ठरत असून, या प्रकल्पासाठी अनेक नागरिक, शेतकरी, नातेवाईक व मित्रपरिवाराकडून मोठ्या प्रमाणात शेअर भांडवलाच्या स्वरूपात रक्कम गोळा करण्यात आल्यानंतर सुमारे तीन वर्षांचा कालावधी उलटल्यानंतरही सुतगिरणीच्या प्रत्यक्ष उभारणीबाबत कोणती ठोस प्रगती दिसून येत नसल्याने विकासाचे स्वप्न पाहणा-या विकासप्रिय नागरिकांमध्ये विविध प्रश्न उपस्थित होत आहेत..
माहूर तालुक्यातील विविध ठिकाणी चर्चील्या जात असलेल्या माहितीनुसार मागील तीन वर्षांपासुन किंबहूंना त्याही पुर्वीपासून माहूर तालुक्यात एका महापुरूषाच्या नावाने सहकारी सुतगीरणी सुरू होणार असल्याची चर्चा आहे. स्थानिक स्तरावर मिळालेल्या माहितीनुसार, याच सहकारी सुतगिरणीसाठी अनेकांनी भागभांडवल म्हणून शेअर्सच्या स्वरूपात किमान दहा हजार रुपयांपासून ते लाखो रुपयांपर्यंत रक्कम भरल्याचे सांगितले जात आहे. तथापि, सुतगिरणीची नोंदणी, जमीन संपादन, प्रकल्प अहवाल (DPR), शासन मंजुरी, बँक कर्ज प्रस्ताव, भागभांडवलाची सद्यस्थिती आणि प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामकाजाबाबत अधिकृत माहिती अद्याप सर्वांसमोर आलेली नसून वरील सर्व कामकाजाविषयी तालुक्यातील जनतेसोबतच सुतगिरणीसाठी शेअर्स स्वरूपात रक्कम जमा करणा-या देणगीदारांत कमालीचे संभ्रमाचे वातावरण आहे..
दरम्यान, संबंधित प्रकल्पाचे प्रवर्तक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तींनी जनतेसह सभासदांसमोर संपूर्ण आर्थिक व प्रशासकीय माहिती जाहीर करावी, अशी मागणी होत असून, विशेषतः आजपर्यंत किती सभासद नोंदणीकृत झाले..?, किती भागभांडवल जमा झाले..?, ती रक्कम कोणत्या बँक खात्यात जमा करण्यात आली..?, सुतगिरणीच्या नोंदणीची स्थिती काय आहे..? आणि प्रकल्प उभारणीसाठी आतापर्यंत कोणती पावले उचलण्यात आली..?, याबाबत खुलासा व्हावा, अशी माफक अपेक्षा सर्वसामान्य विकासप्रेमी मंडळीकडून व्यक्त होत आहे.
एकंदरीतच, मागील तीन ते पाच वर्षांपासून सुरू असलेल्या कथीत सहकारी सुतगिरणीच्या निमित्ताने भागभांडवल म्हणून रोख रक्कम जमा केल्यानंतर सुतगिरणीच्या प्रत्यक्ष उभारणीची स्थिती अद्यापही गुलदस्त्यातच असल्याने जाणकार नागरिकांसोबतच भागभांडवलाच्या स्वरूपात शेअर्स म्हणून रोख रक्कम जमा केलेल्या काही नागरिकांकडून यासंदर्भात सहकार विभागाकडे माहितीचा अधिकार (RTI) अंतर्गत माहिती मागविण्याची तयारी सुरू केल्याची खात्रीलायक माहिती समोर येत असून जर प्रकल्पाची सर्व प्रक्रिया नियमानुसार सुरू असेल, तर संबंधितांनी अधिकृत कागदपत्रे जाहीर करून नागरिकांमधील संभ्रम दूर करावा, असे मत व्यक्त केले जात आहे.. दरम्यान वृत्त लिहीण्यापुर्वी संबंधित प्रकल्पाची प्रत्यक्ष स्थिती काय..? याबाबत प्रकल्पाच्या प्रवर्तकांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. परंतू ‘संपर्कक्षेत्राच्या बाहेर अथवा बंद’ असा संदेश आल्याने अधिकृत प्रतिसाद मिळू शकला नाही. त्यांची भूमिका प्राप्त झाल्यास तीही प्रसिद्ध करण्यात येईल..
“विशेष म्हणजे, माहूर तालुक्यातील मौजे पडसा येथील काही नागरिकांनी सांगितल्याप्रमाणे अंदाजे सन 1990 च्या दशकात एका गृहनिर्माण सोसायटीच्या (हाऊसींग सोसायटी) नावाने एका ने मोठ्या प्रमाणात लोकांकडून पैसे गोळा केले होते. परंतू ती सोसायटी कधीच अस्तित्वात आली नाही. उलट त्यासाठी जमा केलेली रक्कम मात्र त्याच जमा करून घेणा-यास ‘सप्रेम भेट’ ठरली. अशात तिच परिस्थिती व तेच दिवस पुन्हा चालून आले नाही नां..? असा बोलका प्रश्न तत्कालीन वेळेत फसवणुक झालेल्या काही जेष्ठ नागरीकांनी उपस्थित केला असून जस-जसा वेळ जाईल तसे “या” सुतगिरणीचे गुपीत आपोआपच जनतेसमोर येईल अशी बोलकी प्रतिक्रिया काहींनी दिली आहे…





