नोकरी संदर्भईतर
वाई बाजार येथे अवैध रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ;.अजूनही धडक कारवायांची गरज..!!
"अंग गोठवणा-या थंडीत सकाळी पाच वाजता च्या सुमारास 'सैराट' रेतीचोरांवर महसुल कर्मचा-यांची कारवाई"
(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
रेती तस्करीसाठी रात्रीचा दिवस करून अगदी रात्र रात्र भर ट्रॅक्टरच्या कर्णकर्कश आवाजाने ग्रामस्थांना वेठीस धरणा-या रेतीचोर ट्रॅकरला आज (ता. २०) रोजी सकाळी साडेपाच वा. च्या सुमारास महसूल कर्मचा-यांनी पकडले असून अगदी भल्या पहाटे रेतीतस्करी करणा-या एका ट्रॅक्टरवर केलेल्या कारवाईने रेतीचोरांत एकच खळबळ उडाली असून सदरचे ट्रॅकर कारवाईअंती माहूर तहसील कार्यालयाच्या आवारात जमा करण्यात आल्याचे महसूल कर्मचा-यांनी सांगितले आहे…
आज दि. २० डिसें. रोजी सकाळी पाच वाजताच्या सुमारास वाई बाजार येथे नायब तहसिलदार जेठे यांच्यासह वाई सज्जाचे तलाठी राम ठाकरे, ग्राम महसूल अधिकारी सुनिल वनवे, कोतवाल विवेक नागपूरे, लक्ष्मण मेश्राम, पवन पाटील, वाहनचालक शेडमाके तसेच वाई च्या पोलीस पाटील ए.बी. मोरे यांच्या पथकाने सायफळ येथील नदीपात्रातून रेतीची वाहतूक करणारे विनानंबरचे स्वराज कंपनीचे लाल पांढरे ट्रॅक्टर पकडले असून सदरचे ट्रॅक्टर अमोल गावंडे नामक व्यक्तीचे असल्याचे सांगण्यात येेत आहे.. दरम्यान सदर ट्रॅक्टर महसूल कर्मचा-यांनी कारवाईअंती माहूर तहसील कार्यालयात जमा केल्याचे महसूल कर्मचा-यांकडून सांगण्यात आले आहे…
“विशेष म्हणजे काही दिवसांपुर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी निवडणूक कामी असल्याच्या तांत्रिक बाबीचा फायदा घेत तालुक्यातील पैनगंगा नदीपात्रानजीकच्या गावातील सर्वच रेतीचोर अंग झाडून कामाला लागले होते. यावेळी नदीशेजारच्या अनेक गावांत अक्षरश: शेकडो ब्रास रेतीचे साठे जमवून व ते खाली देखील करण्याचा सपाटा याच रेतीतस्करांमार्फत अद्यापही सुरू आहे.. रेतीची विल्हेवाट लावण्यासाठी दिवसभर कुंभकर्णी झोप घेवून रात्रीच्या पाळीला जागोजागी ‘लोकेशन’ ट्रेस करत रेतीची तस्करी करायची हे रेतीतस्करांचे सुत्र आता महसूल कर्मचा-यांना पुर्णपणे अवगत झाले असल्याचे दिसून येत असून आज सकाळी भल्या पहाटे झालेल्या कारवाई प्रमाणेच अजूनही बड्या कारवायांची गरज असल्याचे सर्वसामान्यांतून बोलले जात आहे…