वाई बाजार येथे धाडसी दरोडा ; तिघे संशयीत पोलीसांच्या ताब्यात…
"देवदर्शनासाठी गेलेल्या उत्तरवार कुटुंबियांच्या घरावर चोरड्यांचा डल्ला"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
प्रयागराज येथे देवदर्शनासाठी गेल्याची संधी साधून येथील उत्तरवार कुटुंबाच्या बंद घरावर चोरट्यांनी धाडसी दरोडा टाकत लाखोंचा ऐवज लंपास केल्याची खळबळजनक घटना आज (ता. 10) रोजी सकाळी उघडकीस आली असून याबाबत सिंदखेड पोलीसांत गुन्हा दाखल होवून तीन संशयितांना ताब्यात घेवून चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे…
माहूर तालुक्यातील वाई बाजार येथील नारायण श्रीधर उत्तरवार हे आपल्या कुटुंबियासमवेत दि. ५ रोजी प्रयागराज येथील कुंभमेळ्यासाठी गेले होते.. ते प्रयागराज येथील कुंभ मेळ्याहून आज दि.१० फेब्रवारी रोजी सकाळी ६ वाजता परत आल्यानंतर त्यांच्या घराचे मुख्य द्वार उघडे दिसून आले. तर घरातील सर्व सामानदेखील अस्त-व्यस्त पडलेले दिसले…त्यामुळे उत्तरवार यांनी सिंदखेड पोलीसांत तक्रार दिली असून दिलेल्या तक्रारीत दोन तोळे सोन्याची गोफ तसेच ३० हजार रूपयाची रोख रक्कम चोरून नेल्याची फिर्याद त्यांनी दिली आहे… याप्रकरणी उत्तरवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सिंदखेड पोलीस ठाण्यात गु.र.नं. २५/२०२५ नुसार भारतीय न्याय संहितेचे कलम ३३१ (४) व ३०५ अन्वये अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधवर हे तपास करीत आहेत.. सदर घटनेबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून आज श्वान पथकासह अंगुली मुद्रा पथकाला पाचारण करण्यात आले होते… या दोन्ही पथकांनी कसून तपास केल्यानंतर घटना लवकरच उघडकीस येणार असल्याच्या चर्चांना पेव फुुुुटले असून याप्रकरणी तीन संशयितांना सिंदखेड पोलीसांनी ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे…
“वाई बाजार येथे आज उघडकीस आलेल्या घटनेची तातडीने दखल घेत यासारख्या घटना घडू नयेत यासाठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व गावांत कार्यन्वित असलेल्या ग्राम सुरक्षा दल तसेच नागरीकांनी सतर्क राहण्याचे आवाहन सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक रमेश जाधवर यांनी केले आहे….

