ईतर
खळबळजनक..! पाचोंदा घरफोडी प्रकरणातील पोलीसांनी नेलेल्या ‘त्या’ संशयिताचा थांगपत्ताच नाही…?
"आदिवासी महिलेचे पोलीस अधीक्षकांकडे निवेदन ; मुलाच्या सुरक्षिततेबाबतही व्यक्त केला संशय..?"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
माहूर तालुक्यातील मौजे पाचोंदा येथील घरफोडीच्या प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या प्रकरणात एक खळबळजनक बाब समोर आली असून शनिवारी राहत्या घरातून माहूर पोलीसांनी उचललेला “तो” संशयित आरोपी नेमका कुठे आहे..? त्याची माहीती मिळावी यासाठी संशयिताची आई चंद्रकलाबाई तोडकर हिने पोलीस अधिक्षकांकडे लेखी अर्ज देवून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी पोलीस अधीक्षक, नांदेड यांच्याकडे केलेल्या निवेदनातून केली आहे.
आज दिनांक ११ ऑगस्ट २०२६ रोजी दिलेल्या निवेदनानुसार, अर्जदार चंद्रकलाबाई तोडकर यांचा मुलगा श्रीकांत सुभाष तोरकर हा कुटुंबातील कर्ता पुरुष असून तो शेती व मजुरीचे काम करतो. दिनांक ८ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे ९ ते १० वाजण्याच्या दरम्यान माहूर पोलीस ठाण्यातील काही अधिकारी व कर्मचारी त्यांच्या घरी आले. त्यांनी कोणतीही स्पष्ट माहिती न देता घरात प्रवेश करून झोपलेल्या श्रीकांतला बाहेर काढल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. त्यावेळी पोलिसांनी श्रीकांतला मारहाण केल्याचे तसेच त्याला जबरदस्तीने ताब्यात घेऊन माहूर पोलीस ठाण्यात नेल्याचे अर्जदाराने म्हटले आहे. तथापि, पोलिसांनी श्रीकांतला कोणत्या कारणासाठी ताब्यात घेतले.? त्याच्याविरुद्ध कोणता गुन्हा आहे किंवा त्याला नेमके कुठे नेण्यात आले, याबाबत कुटुंबीयांना समाधानकारक माहिती देण्यात आली नसल्याचा दावाही निवेदनात करण्यात आला आहे… एवढेच नव्हे तर, पोलिसांनी श्रीकांतला मारहाण करताना तो बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केल्याचा आणि त्यानंतर त्याला वाहनातून कुठेतरी नेण्यात आल्याचा संशय चंद्रकलाबाई यांनी दिलेल्या निवेदनातून व्यक्त केला आहे.
दरम्यान सदर प्रकरणातील संशयितास पोलीसांनी ताब्यात घेतल्यानंतरची कसलीही माहीती मिळाली नसल्याचा आरोप चंद्रकलाबाई तोडकर या आदिवासी महिलेने केले असून पोलीसांच्या ताब्यात असताना मुलाच्या जीविताला अथवा प्रकृतीला काही धोका निर्माण झाला असण्याची शक्यता असल्याने या प्रकरणाची तातडीने चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे..तर पोलिसांनी श्रीकांतला नेल्यानंतर त्याच्याबाबतची माहिती कुटुंबीयांना देण्यात आली नसल्याचेही निवेदनात नमूद आहे. त्यामुळे श्रीकांतला नेमक्या कोणत्या कारणासाठी ताब्यात घेण्यात आले..?, त्याची कायदेशीर नोंद करण्यात आली होती का..? त्याची वैद्यकीय तपासणी झाली का..? आणि त्याला पुढे कुठे नेण्यात आले..? याबाबत अनेक प्रश्न निवेदनकर्त्या महिलेने जिल्हा पोलीस अधिक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी माहूर यांना आज दि. 11 ऑगस्ट रोजी दिलेल्या लेखी निवेदनातून उपस्थित केले आहेत.
विशेषत: अर्जदार महिलेने आपण अनुसूचित जमाती समाजातील असून गरीब कुटुंबातील असल्याचे नमूद करत या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली असून संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून नियमबाह्य प्रकार घडला असल्यास त्यांच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.. तर या निवेदनाच्या पार्श्वभुमिवर निवेदनातील आरोपांची स्वतंत्रपणे पडताळणी होणे बाकी असून, संबंधित माहूर पोलीस प्रशासनाची अधिकृत बाजू समोर येणे बाकी आहे. तथापि, माहूर पोलीसांकडून याबाबतची अधिकृत माहीती मिळविण्यासाठी आम्ही भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला होता. परंतू संपर्क झाला नाही. परिणामी पोलिसांकडून या प्रकरणाबाबत अधिकृत स्पष्टीकरण मिळाल्यानंतरच प्रकरणाचे सत्य व तथ्य समोर येवून प्रत्यक्ष घडामोडी समोर येणार असून पोलीसांची बाजू देखील आम्ही प्रसिध्द करणार आहोत…
(टिप: – या बातमीचा फॉलोअप लवकरच…)
(Comming Soon……………)
“विशेष म्हणजे BNSS कलम 47 नुसार अटक झालेल्या व्यक्तीला अटकेचे कारण सांगणे आवश्यक आहे… कलम 48 नुसार त्याच्या नातेवाईक/मित्राला अटकेची माहिती देण्याची तरतूद आहे… कलम 53 नुसार अटक झालेल्या व्यक्तीची वैद्यकीय तपासणी, कलम 56 नुसार आरोग्य व सुरक्षिततेची काळजी आणि कलम 57-58 नुसार व्यक्तीला संबंधित पोलीस अधिकारी/दंडाधिकाऱ्यासमोर आणणे व 24 तासांपेक्षा अधिक काळ विनामजिस्ट्रेट आदेशाने ठेवू नये, अशी तरतूद आहे. असा कायद्याचा दंडक असतानाही सदर प्रकरणातील संशयित अचानक गायब कुठे झाला.? हा प्रश्न आता गंभीर व संवेदनशील पातळीवर पोहोचला असून “पोलिसांनी नेले, पण कुठे नेले..? कुठे आहे..? हा स्वतंत्रपणे तपासण्यासारखा गंभीर मुद्दा असला तरीही अर्जदार महिलेने निवेदनातून केलेले आरोप हे खरे ठरू नयेत.. किंबहूंना “जय-भिम” चित्रपटातील “ती” पटकथा प्रत्यक्षात पुढे येवू नये… एवढीच अपेक्षा…!





