डोळ्यांंत मिरचीची पुड टाकून बचतगट कर्मचा-यास लुटले ; अडीच लाख रूपये लंपास…
"मारहाणीत गंभीर जखमी ; सायफळ नजीक सकाळी सव्वा अकराची घटना"
(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
बचतगटाची वसूली करून परतणा-या बचतगट कर्मचा-याच्या डोळ्यात मिरचीची पुड टाकून गंभीर मारहाण करत तब्बल अडीच लाख रूपये लुटल्याची गंभीर घटना आज दि. ३ मार्च रोजी सायफळ नजीक घडली असून दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे..
घटनेसंबंधीच्या प्राथमिक माहितीनुसार माहूर तालुक्यातील मौजे सायफळ येथे बचतगटाचे कर्मचारी प्रविण कौरे हे आज दि. ३ मार्च रोजी त्यांच्या नियोजित बचतगट मिटींग तथा वसूलीसाठी त्यांची दुचाकी क्र. एम.एच. २७ सी.एस. ७३८१ या दुचाकीवरून मिटींगसाठी गेले होते. दरम्यान सकाळी ११ वाजता मिटींग संपवून बचतगटाच्या वसूलीपोटी जमवलेले दोन ते अडीच लाख रूपये घेवून वाई बाजार कडे निघाले असताना सव्वा अकराच्या सुमारास सायफळ ते गोकुळ रोडवर शेतातून जाणा-या जोडरस्त्यावर लुटमारीच्या उद्देशाने चार जण दबा धरून बसले होते. दरम्यान सदर बचतगट अधिकारी समोरून येत असल्याचे पाहून अगदी रोडवर येवून त्यांच्या डोळ्यात मिरचीची पुड टाकली व कौरे यांच्या जवळ असलेली बँग हिसकावण्यासाठी त्यांना लाकडी काठ्यांनी बेदम मारहाण केली.. या मारहाणीत कौरे यांच्या डोक्याला गंभीर स्वरूपाची मारहाण होवून ते भांबावून गेल्याने चोरटे त्यांची पैशांची बँग हिसकावून पसार झाले..तर काही क्षणांत रस्त्याने येणा-या काहींंनी जखमी कर्मचा-यांस वाई बाजारच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केल्यानंतर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारालाठी माहूरच्या ग्रामीण रूग्णालयाकडे रवाना केले..
घटनेची माहिती मिळताच सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक सुशांत किनगे यांच्यासह पो.हे.काँ. पठाण यांनी घटनास्थळ गाठून घटनास्थळाची पाहणी केली.. यावेळी घटनास्थळावर रक्ताचे डाग असलेल्या तीन लाकडी काठ्या पोलीसांनी ताब्यात घेतल्या असून त्याच ठिकाणी डांबरी रोडवर मिरचीची पुड देखील पडल्याचे दिसून आले…. तर याप्रकरणी सिंदखेड पोलीसांत अद्याप घटनेची तक्रार न आल्याने अधिकची माहिती प्राप्त होवू शकली नाही…
“विशेष म्हणजे सबंधित बचतगट कर्मचा-याची मिटींग संपल्यानंतर तो कोणत्या मार्गाने व कोणत्या गाडीवरून तसेच किती वेळात येणार याची खात्रीशीर माहिती सदर लुटारूंना नेमकी कशी मिळाली.. याबाबत विविध तर्कवितर्क लढविले जात असून घटनास्थळ तसेच परिसराची संपुर्ण माहिती असणा-यांचेच हे कारस्थान असावे असा कयास बांधला जात असला तरी याप्रकरणात स्थानिक का इतर काही.. संबंध..? याबाबतच्या दोन्ही बाजून तपास करण्याचे आव्हान पोलीसांसमोर आहे… त्यामुळे प्रकणाच्या मुळाशी नेमके काय..? हे पोलीस तपासातूनच कळणार आहे…