सामाजिक
सावरखेड-बोंडगव्हाण ग्रा.पं.च्या गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी महिलांचे उद्यापासून आमरण उपोषण…
"घरकुल यादीतील गोंधळ, गावठाण जागा व विविध कामांत भ्रष्टाचाराचा आरोप"
(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
सावरखेड- बोंडगव्हाण ग्राम पंचायतीच्या गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी आज दि. २५ पासून ग्रा.पं. कार्यालयासमोर महिलांचे आमरण उपोषण सुरू होणार असून घरकुल यादीतील अफरातफरीसह यादीत केलेला गोंधळ, गावठाण जागा, रोहयो ची कामे तसेच मुख्यमंत्री पेयजल योजनेच्या बोगस कामांच्या चौकशीसाठी येथील महिलांनी उपोॊणाचे हत्यार उपसल्याने याकडे सर्व तालुक्याचे लक्ष वेधले आहे..
माहूर तालुक्यातील मौजे सावरखेड – बोंडगव्हाण ही गट ग्राम पंचायत असून येथील विविध विकासकामे व शासकीय योजनांत ग्राम पंचायत कार्यालयाकडून झालेल्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर येथील सौ. शालू प्रमोद गायकवाड, सौ. वंदना दिपक भालेराव व सौ. अश्विनी अंकुश मोरे या महिलांनी गटविकास अधिका-यांना दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे येथील ग्रा.पं. च्या चौकशीसाठी दि. २५ सप्टेंबरपासून ग्रा.पं. कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसत असल्याचे सांगितले आहे…
दरम्यान दिलेल्या निवेदनात.. घरकुलाच्या यादीत ग्रा.पं. ने हस्तक्षेप करून गरीबांची नावे वगळण्याासह ज्या लोकांची नावे मोदी आवास योजनेत होती त्याच लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेत कायम ठेवणे… आर.सी.सी. चे पक्के घर असताना प्रधानमंत्री आवास योजनेत कायम ठेवणे… पैनगंगा चिमटा धरण याचा नातेवाईकांना लाभ मिळावा यासाठी गावठाण जमीनी नातेवाईकांच्या नावे करणे… शेततळ्यांत झालेला भ्रष्टाचार.. मुख्यमंत्री पेयजल योजनेअंतर्गत बोगस कामे व गुत्तेदारावर कारवाई… घरकुलाचा पुर्वी लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांची नावे घरकुल यादीत जशीच्या तशी कायम ठेवणे..तसेच प्रस्तापित लोकांना घरकुल योजनेचा लाभ देवून गरीब लोकांना लाभ देण्यापासून वंचित ठेवणे….
आदी मुद्यांवर वरील महिला भगीनींनी आज दि. २५ सप्टेंबर पासून ग्राम पंचायत कार्यालय सावरखेड बोडगव्हाण येथे आमरण उपोषणास बसणार असल्याचे लेखी निवेदन गटविकास अधिकारी माहूर यांना दिले असून संपुर्ण माहूर तालुक्यात घरकुल योजनेत मोठ्या प्रमाणात गोंधळसदृष्य परिस्थिती असल्याने यावर प्रशासन नेमकी काय भुमिका घेते याकडे संपुर्ण तालुक्याचे लक्ष वेधले आहे….