बिझनेस
शेतक-यांनो सावधान..!! माहूर तालुक्यात अनेक व्यापा-यांच्या इलेक्ट्रॉनिक वजन काट्यांत ‘सेटींग’ ची उलटफेर….?
"इच्छित सेंटींग करून होतेय शेतक-यांच्या मालाची लूट ; 10 किलोच्या प्रमाणाला 800 ग्रॅम माल 'फुकट' व्यापा-याच्या घशात...?"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
आसमानी संकटाचा सामान करून दारिद्र्याच्या खाईत लोटलेल्या शेतकरी राजासमोर शेतकी माल खरेदी करणा-या व्यापा-यांच्या रूपात आणखी एक महाभंयकर, लुटारू संकट पिकवलेल्या मालाची लुट करण्यासाठी उभे ठाकले असून शेतक-यांचा माल घेताना वापरण्यात येणा-या इलेक्ट्रॉनिक वजन काट्याचा आधार घेत त्याच्या सेटींगमध्ये इच्छित फेरफार करून खरेदी करण्यात येणा-या मालावर इच्छित नफा कमावण्याचा नवा ‘फंडा’ वाई बाजारसह, सारखणीं, हिवळणी, वानोळा, तसेच माहूर शहरासह संपुर्ण माहूर तालुक्यात लुटारू व्यापा-यांकडून राबवला जात असल्याची खळबळजनक माहीती समोर आली आहे. याकामी वैधमापणशास्त्र विभागातील अधिका-यांना वेळेवर दिल्या जाणा-या बक्षिसामुळे ‘तेरी भी चुप, मेरी भी चुप..!’ या गोपनीय सुत्रामुळे शेतकीमाल खरेदीच्या नावाखाली व्यापा-यांचे चांगभले तर शेतकरीवर्ग अधिकच दारिद्र्याच्या खाईत लोटला जात असल्याचे भयान वास्तव सध्या वरील ठिकाणासह संपुर्ण माहूर तालुक्यात दिसून येत आहे…
चालू वर्षात आसमानी संकटाने त्रस्त झाल्याने शेतकी मालाच्या उत्पन्नात कमालीची घट झाली. परिणामी दस-याच्या मुहुर्तावर आपली खरेदीची प्रतिष्ठाने उघडणा-या व्यापा-यांना दिवाळीनंतरही म्हणावी तशी मालाची आवक नाही. त्यामुळे नफा तर कमवायचाच या नफेखोर लालसेतून काट्याच्या थेट सेटींगमध्येच फेरबदल करून 10 किलो मालाच्या प्रमाणाला तब्बल 800 ग्रॅम अतिरिक्त माल कसा जास्त येईल याची गोपनीय सेटींग करून देणारे नांदेड व यवतमाळ येथील काही काटा तज्ञ महाभाग व्यापा-यांकडे नियमित फे-या मारत असून गोपनीय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील बहुतांश शेतकी माल खरेदी करणा-या व्यापा-यांनी त्यांच्या इलेक्ट्रॉनिक वजन काट्यात इच्छित फेरबदल करून घेतल्याची खळबळजनक माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर एका काटा दुरूस्ती करणा-या नांदेड येथील तज्ञाने सांगितले आहे..
प्राप्त गोपनीय माहितीनुसार प्रती 10 किलोच्या प्रमाणाला 800 ग्रॅम याप्रमाणे प्रतिक्विंटल मालाला तब्बल 8 किलो एवढा शेतक-यांचा कष्टाचा माल संबंधित व्यापा-यांच्या घशात फुकट जाणार असून इतर स्वरूपात जाणारा जसे की, मॉइश्चर, कट्टी, खराबी व व्यापा-यांकडून लावण्यात येणारी इतर स्वरूपाची कट्टी ही यातील व्यापा-यांचा अधिकचा नफा आहे…
विशेषत: शेतकीमाल खरेदी करणा-या व्यापा-यांसोबतच किराणा दुकान, सोन्याचांदीचे दुकान तसेच अगदी भंगार खरेदी करणा-या व्यापा-यांकडे देखील आज इलेक्ट्रॉनिक वजनकाटे असून या काट्यामुळे फसवणुकीची भीती नसल्याच्या भ्रमात शेतकरी व ग्राहकांची प्रचंड लूट केली जात असल्याचे भयान वास्तव समोर आले आहे… त्यामुळे तालुक्यातील सर्व व्यापा-यांच्या इलेक्ट्रॉनिक काट्यांची वैधमापनशास्त्र विभागाच्या अधिका-यांनी स्पेशल टिम बनवून व पोलीस संरक्षणात तपासणी केल्यास तालुक्याती 50 ते 75 टक्क्यांच्या वर काट्यांमध्ये दोष आढळून येईल अशी खात्रीशीर माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर नांदेडच्या काटा तज्ञाने सांगितली आहे.. याकामी काट्याच्या देखभालीसाठी अनेक काटातज्ञांंच्या व्यापा-यांकडे दर आठ ते पंधरा दिवसाला नियमित फे-या होत असून काट्यात फेरबदल करण्यासाठी प्रती व्यापा-यांकडून नियामित काटा चेकींगच्या नावाखाली एक ते दोन हजार रूपये चेकींग चार्ज काटातज्ञ घेवून जात असल्याचेही समोर आले आहे…
विशेष म्हणजे २००९ च्या लीगल मेट्रोलॉजी कायदा आणि त्याचे लीगल मेट्रोलॉजी रूल्स २०११ नुसार वजनकाट्यासंबंधात वजनमाप निरिक्षकाने दिलेले प्रमाणिकरणाचे प्रमाणपत्र वजन काटा ठेवलेल्या जागी दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे. सोनेचांदीचा व्यवसाय करणा-या सराफ मंडळींनी किमान क्लास वर्ग दोनचे वजनकाटे वापरण्याचा कायद्याचा दंडक असून डिजीटल काटे हे सिल केलेले असणे अत्यावश्यक आहे.. असे असतानाही वरील बाबींपासून ग्राहक व शेतकरीवर्ग आजही अनभिज्ञ असून व्यापा-यांचे वजनकाटे तपासण्यास येणारी अधिकारी मंडळीदेखील एका ठिकाणी बसून “मोठ्या वजनाची पाकीटे” घेवून जात असल्याचे सांगण्यात येत आहे…
…….ही बाब वजनमापशास्त्र विभागांतर्गत येत असल्याने हा विभाग नेमका कुठे व कसा कार्य करतो याबाबत सर्वसामान्यांना यत्किंचितही माहीती नसून या विभागाचे अधिकारी येतात कधी..? आणि जातात कधी..?? याचा सर्वसामान्यांना थांगपत्ताही लागत नाही.. त्यामुळे शेतकरी व ग्राहकांच्या व्यापा-यांकडून होत असलेल्या लुटीस व्यापा-यांबरोबरच संबंधित विभागाचे अधिकारीदेखील तितकेच जबाबदार असून जिल्हाधिका-यांनी सदर प्रकरणी स्वत: लक्ष घालून पोलीस विभागाच्या देखरेखीखाली वाई बाजारसह संपुर्ण माहूर तालुक्यातील व्यापा-यांच्या वजनकाट्यांची तपासणी करून वजनकाट्यात फेरफार करून लूट करणा-या व्यापा-यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी रास्त मागणी शतकरी व सर्वसामान्यांतून होत आहे…





