दिवाळीच्या ‘दिखाऊ’ विश्रांतीनंतर वाई बाजारात अवैध ‘मटका-गुटखा’ व बनावट ऑनलाईन लॉटरी व्यवसाय जोमात सुरू….
"मटकाकिंग मंडळीचा बोलबाला ; सिंदखेड पोलीसांचा कानाडोळा..... अनेक संसारांची "संक्रांत... सुशिक्षित बेरोजगारांची फळी मटका-गुटखा व्यवसाय सुरू करण्यासाठी मागणार थेट विशेष पोलीस महानिरिक्षकांना लेखी परवानगी.!!"
(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
ऐन दिवाळीतील मटका किंग मडळींच्या दिखाऊ विश्रांतीनंतर वाई बाजारात पुन्हा मटक्यासह बनावट ऑनलाईन लॉटरी व गुटखा व्यवसायांने पुन्हा डोके वर काढले असून सिंदखेड पोलीसांच्या हेतुपुरस्सर दुर्लक्षाने वाई बाजारात मटका किंग मंडळीचा बोलबाला दिसून येत असतानाच अनेक संसारांची मात्र संक्रांत होणार असल्याचे बोलके चित्र सध्या वाई बाजारात दिसून येत आहे..
राजकीय तसेच व्यावसायिक दृष्ट्या माहूर तालुक्यातील अत्यंत महत्वाचे ठिकाण असलेल्या वाई बाजार बाजारपेठेत सध्या इतर व्यवसायांवर मंदी असली तरी गुटखा,मटका व ऑनलाईन लॉटरी व्यवसायात मात्र कमालीची ‘तेजी’ पहावयास मिळत असून बाजारपेठेच्या चक्क मुख्य चौकातच मटका व्यवसायीक तसेच ऑानलाईनच्या नावाखाली संगणकातच ‘प्रोग्राम’ फिड केलेली ऑफलाईन परंतू बनावट ऑनलाईन दर्शवणा-या लॉटरी व्यवसायाने पुन्हा डोके वर काढल्याचे विदारक चित्र पहावयास मिळत आहे.. यात प्रामुख्याने मटका बुकींच्या कार्यालयात सरकारी कर्मचारी तथा “बँकींग” कर्मचा-यांनाही लाजवेल असा बुकींचा थाट पहावयास मिळत असून राजरोसपणे दुचाकींवरून केला जाणारा गुटख्याच्या पुरवठ्यासह लॉटरीच्या नावाखाली अनेकांचे खिसे कापणा-या ऑनलाईन लॉटरी व्यवसायासाठीही जणू सरकारी परवानाच मिळाल्याचा आव बिनदिक्कतपणे हा अवैध व्यवसाय सुरू असल्याने अप्रत्यक्षरित्या पोलीस प्रशासनाच्या कार्यप्रणालीचे धिंडवडे वाई बाजारच्या मुख्य चौकात निघताना दिसून येत आहेत…
विशेष म्हणजे सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोबाईलवरून तसेच छुप्या पद्धतीने सुरू असलेला मटका व्यवसाय ऐन दिवाळीत हा व्यवसाय बंद असल्याचा आव मटकाकिंग मंडळीने आणला होता. तो का..? यामागचे गौडबंगाल आता उजेडात आले असून प्राप्त माहितीनुसार पोलीसांवर मानसिक दडपण आणून हप्त्याची रक्कम कमी करून घेण्यासाठी तसेच दिवाळीतील हप्ता टाळण्यासाठी मटकाकिंग’ मंडळींकडून राबवलेला ‘तो’ एक ‘गेमप्लँन’ असल्याचेही आता सांगण्यात येत आहे… तर हा हातखंडा तंतोतंत प्रभावी ठरला असून यामुळे पोलीसांचा हप्ता थेट अर्ध्यावर आल्याची माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर एका मटका बुकीने दिली आहे.. तर वाई बाजारसह परिसरात सुरू असलेला ‘मटका’ व्यवसाय कमालीचा फोफावत असतानाच आंबटशौकीनांची हौस भागवण्यासाठी गुटख्याची वाढलेली आवक ऐनवेळी प्रशासनाची झोप उडवण्यासाठी पुरेशी असून सिंदखेड पोलीसांच्या ‘तथास्तू…!!’ मुळे सुरू असेल्या अवैध व्यवसायांने वाई बाजार हे जणू ‘अवैध धंद्यांचा अड्डा’च बनत चालले असल्याची बोलकी प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.. त्यामुळे यावर आळा बसवून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व स्पेशल पथके नेमून सुरू असलेले सर्व अवैध व्यवसाय बंद करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत असून मटक्याबरोबरच गुटका, चिडी-फकडी, तिन पत्ती तसेच ऑनलाईन लॉटरीच्या नावाने सुरू असलेले सर्व मटक्याचे व्यवसाय पुर्णपणे बंद व्हावेत अशी रास्त मागणी नागरीकांकडून होत आहे…
एकंदरीत अशाच प्रकारचे विदारक चित्र सिंदखेड पोलीस ठाण्याच्या अंतर्गत अनेक गावांसह संपुर्ण तालुक्यात असून वाई बाजारसह परिसरातील अंजनखेड, हरडफ, बोंडगव्हाण, मदनापूर, सारखणी, सेलू, करंजी, आष्टा तसेच माहूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेले माहूरसह पापलवाडी, हिवळणी, लखमापूर व लांजी, इवळेश्वर, हडसणी या अनेक गावांत दिसून येत असल्याने पोलीस प्रशासनाने तातडीने हा व्यवसाय बंद करून लालसेपायी अनेकांचे खिसे कापणारा हा गोरखधंदा बंद करावा अशी मागणी जनमानसातून होत आहे..
……सदरचा व्यवसाय बंद करण्यात सिंदखेड तसेच माहूर पोलीसांना अपयश आल्यास सुशिक्षित बेरोजगारांची मोठी फळी थेट विशेष पोलीस महानिरिक्षकांसह जिल्हा पोलीस अधिक्षकांची भेट घेवून सध्या बिनदिक्कतपणे सुरू असलेल्या मटका व्यवसायाप्रमाणेच स्वत:चा मटका व गुटखा व्यवसाय सुरू करण्यासाठीची लेखी परवानगी मागणार असल्याचे काही सुशिक्षित बेरोजगारांकडून सांगण्यात आले आहे…