क्राइम
दलितवस्ती निधीचा भ्रष्ट ‘माहूर पॅटर्न’..! दलीत वस्ती निधीचा गळा चिरून तब्बल 50 लाखांचा निधी डोंगरात ‘स्वाहा’ ; गरिबांच्या हक्कावर लोकप्रतिनिधींचा ‘दरोडा…?’
"दलितवस्ती निधी गैरवापराचा दुसरा गैरप्रकार उघड ; विरोधक झोपेत होते काय..? ; तक्रारदाराचा संतप्त सवाल..!, दुसरी तक्रार दाखल..!!"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
(बाबाराव कंधारे)
किनवट/माहूर
पवित्र शक्तीपीठ असलेल्या माहूर गडाच्या कुशीत नगरपंचायतीने भ्रष्टाचाराचा एक असा ‘अक्राळविक्राळ’ डोंगर उभा केला असल्याचे दिवसागणीक चित्र आता अधिकाधिक स्पष्ट होत असून दलीत वस्ती निधीचा गळा चिरून तब्बल 50 लाखांचा निधी डोंगरात ‘स्वाहा’ करताना गरिबांच्या हक्कावर सशस्त्र दरोडा टाकणा-या लोकप्रतिनिधींनी केलेल्या दलितवस्ती निधी गैरवापराचा दुसरा गैरप्रकार उघड झाल्याने माहूर नगर पंचायतीच्या बेशरमपणाचा आणखी एक प्रकार समोर आल्याने सत्ता आणि पैशाच्या मस्तीने माणुसकी आणि कायदे दोन्ही पायदळी तुडवले गेल्याचा ज्वलंत प्रकार यानिमित्ताने समोर आला आहे….
माहूर येथील पुरातन रामगड किल्याच्या अगदी पायथ्याशी असलेल्या एका गर्भश्रीमंत व स्वयंघोषित राष्ट्रीय संताला खुष करण्याच्या नादातून महसूल विभागासोबतच वनविभाग, पुरातत्व विभाग व स्वत: माहूर नगर पंचायतीसह इतरही दोन विभागांना आपल्या पापात सहभागी करून घेताना अनुसूचित जाती वस्त्यांच्या (दलीत) विकासासाठी असलेला ‘पवित्र निधी’ चक्क वस्तीच नसलेल्या ठिकाणी, डोंगर फोडून बेकायदेशीर रस्ता बनवण्यासाठी वापरला गेल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. ही बाब उजागर झाली असतानाच दुसरा एक असाच प्रकार समोर आला आहे. त्यात अगदी मागील वर्षी (सन २०२४-२५) शहरातील प्रभाग क्र. ३ आणि ७ मधील दलित बांधव आजही मूलभूत सुविधांसाठी ‘नरक’ यातना भोगत असताना त्यांच्या हक्काचा निधी पैसा रामगड किल्ल्याच्या दगडांत जिरवल्याचा खळबळजनक प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे...

माहूर नगरपंचायतीचा हा प्रकार म्हणजे केवळ गरिबांच्या हक्कावर दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा नसून दलितवस्ती निधीचा अपहार करताना गरीबांच्या नावावर माहूरच्या विकासाला फासलेला काळीमा असल्याचा हा जिवंत पुरावा आहे.. दरम्यान जिथे माणसांची सावली देखील नाही, तिथे रस्ता नेमका कुणासाठी.. ? हे न उलगडणारे कोडे असून माहूर नगर पंचायतचा भ्रष्ट व ‘सब माल अंदर’ चा धडा गिरवीत असताना विरोधी पक्ष काय झोपा काढत होता काय.? असा संतप्त सवाल उपस्थित होत असून माहूर नगर पंचायतीच्या भ्रष्टाचार व गैरप्रकाला विरोध न करता निमूटपणे सहन करणे म्हणजे न.पं. च्या गैरकायदेशीर कामाला प्रत्यक्ष पाठींबाच असल्याचे थेट दिसून आले आहे…

दरम्यान येथील तक्रारदार केशव भगत यांनी आज दि. ११ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी नांदेड तसेच राष्ट्रीय अनु. जाती आयोगाकडे केलेल्या लिखीत तक्रारीनुसार माहूर नगर पंचायतने सन २०२४-२५ च्या दलीत वस्ती सुधारणा निधीतून सुमारे दीड कोटी रुपयांची तरतूद केली. नियमानुसार हा निधी जिथे दलित समाजाची लोकसंख्या जास्त आहे, तिथे खर्च होणे बंधनकारक होते. मात्र, नगरपंचायतीच्या कारभाऱ्यांनी चक्क रामगड किल्ल्याच्या पायथ्याशी, जिथे माणूस फिरकायलाही घाबरतो, अशा निर्मनुष्य ठिकाणी अक्राळविक्राळ डोंगर तोडून रस्ता काढला असल्याची फोटोसह पुरावे देवून तक्रार केली आहे… तथापि, ज्या ठिकाणी हा रस्ता बनवला, तिथे दलीत वस्ती सोडाच, पण साधी एक झोपडीही अस्तित्वात नाही. केवळ कंत्राटदार आणि लोकप्रतिनिधींचे ‘खिसे’ गरम करण्यासाठी हा निसर्गाचा आणि सरकारी तिजोरीचा खून करण्यात आला असल्याचे तक्रारीत नमूद करून (देवदेवेश्वरी मंदिर ते अविनाश दत्त मंदिर रस्ता ५० लाख रु.) हा परिसर दलीत वस्तीत येत नसतानाही केवळ ‘मलिदा लाटण्यासाठी हा निधी दलितवस्तीपासून थेट जंगलात व माळरानात वळवून माहूर नगर पंचायतीच्या भ्रष्ट लोकप्रतिनिधींनी चक्क सरकारी तिजोरीवर डल्ला मारला असल्याचा लेखी तक्रारीतून आरोप केला आहे….तर नगरपंचायत माहूरने राखीव वनक्षेत्र आणि वर्ग-२ च्या जमिनीवरून बेकायदेशीर रस्ता बनवण्यासाठी जड साधनसामग्रीने खोदकाम केल्यामुळे ऐतिहासिक रामगड किल्ल्याचे बुरुज कोसळण्यास सुरुवात झाली आहे. या गंभीर प्रकरणात पुरातत्व विभागाने नगरपंचायतीला नोटीस बजावून कारवाई प्रस्तावित केली असतानाच पुन्हा दलीत वस्तीच्या निधीतून डोंगर फोडण्याचे धाडस केेेेल्याचा दुसरा एक प्रकार समोर आल्याने माहूर नगर पंचायतीला आजवर मिळालेल्या दलितवस्ती निधीचा संपुर्ण हिशोब शासनाने घेण्याची गरज निर्माण झाली असून नगर पंचायत अस्तित्वात आल्यानंतर अगदी ‘खटारा’ मोटारसायकलवर फिरणारे लोकप्रतिनिधी आता चक्क आलिशान वातानुकुलीत गाड्यांत फिरत असल्याने हा ‘एैशो-आराम’ दलितवस्ती निधीच्या पाठबळावर तर नाही नां..? असा संतप्त सवाल माहूर शहरातील विकासापासून वंचित दलित बांधवांकडून विचारला जात आहे….

“विशेष म्हणजे माहूर शहरात पाणीपुरवठा ठप्प आहे, नाले तुंबलेत, पथदिव्यांची दैना, तसेच घरकुल योजनेत गरिबांचे प्रचंड हाल होत आहेत. असे असताना दलित वस्तीचा निधी डोंगरात स्वाहा होत असताना (देवदेवेश्वरी मंदिर रोड ते अविनाश दत्त मंदिर ५० लाख रु.) हा परिसर दलीत वस्तीत येत नसतानाही, केवळ ‘हिशोब’ पूर्ण करण्यासाठी हा निधी वळवून चक्क जंगलाकडे वळवून सरकारी तिजोरीवर डल्ला मारला गेला. यावर विरोधी पक्षाने साधा एक ‘ब्र’ शब्दही काढला नाही. ही एक विशेष बाब यानिमित्ताने पुढे आली असून सत्ताधारी आणि विरोधक यांनी ‘निधी वाटपात’ हातमिळवणी करून माहूरच्या जनतेची फसवणूक केली असल्याचा खळबळजनक आरोप या तक्रारीतून केला आहे… तथापि, कालपर्यंत साधी सायकल फिरवण्याची ऐपत नसलेले काही नगरसेवक अवघ्या एका टर्ममध्ये ‘कोटी’धीश कसे झाले..? एवढेच नव्हे तर जिल्हाधिकारी नांदेड यांच्या न्यायदालनात नगरसेवकांच्या अपात्रतेसह फौजदारी कारवाईचे प्रकरण प्रलंबित असतानाच या नव्या घोटाळ्यामुळे माहूर नगरपंचायतीच्या बरखास्तीची टांगती तलवार अधिक धारदार बनली असून केवळ ‘दलीत वस्ती’ सुधारण्यासाठी कागदोपत्रीची मागणी दाखवून प्रत्यक्षात मात्र तोच निधी हडपण्याचे ‘बेशरम’ कृत्य करणा-याया माहूर नगर पंचायत विरोधातील केशव भगत यांच्या नव्या तक्रारीमुळे प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून या महाघोटाळ्याच्या विरोधात आता जिल्हाधिकारी नांदेड यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधानांकडे पुराव्यांसह तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हा प्रकार म्हणजे ‘अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा’ (Atrocity Act) आणि भारतीय न्याय संहितेनुसार विश्वासघाताचा गंभीर गुन्हा असून याप्रकरणी गुन्हे दाखल होवून दोषींना लवकरच कर्माची फळे चाखायला मिळतील अशी मिश्किल प्रतिक्रिया तक्रारदार केशव भगत यांनी आमच्या वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे…..





