ईतर
कायद्याच्या नजरेतून..!! दत्तशिखर संस्थानच्या कारभारात पारदर्शकतेसाठी चिंतामण भारती महाराजांची एकेरी झुंज…!
न्यायालयीन प्रकरण प्रलंबित असतानाच राहत्या घरात हस्तक्षेपाचा आरोप ; तहसीलदारांकडे संरक्षणाची मागणी..!! "धर्मादाय आयुक्तांकडे दुरुस्ती-सुधारणेची मागणी ; विश्वस्त मंडळींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह..?"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
(बाबाराव कंधारे)
किनवट/माहूर
दत्तशिखर संस्थानच्या कारभारात अधिक पारदर्शकता, शिस्त आणि उत्तरदायित्व यावे, संस्थानच्या व्यवस्थापनातील विविध बाबी स्पष्ट व्हाव्यात आणि धार्मिक संस्थेचा कारभार अधिक नियमबद्ध पद्धतीने चालावा, यासाठी चिंतामण धनराज भारती महाराज यांनी उभारलेली कायदेशीर लढाई आता वेगळ्याच वळणावर पोहोचली असून प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना त्यांच्या राहत्या घरात विश्वस्थ हस्तक्षेप करीत असल्याचा खळबळजनक आरोप करून त्यांनी तहसीलदारांकडे संरक्षणाची लेखी मागणी केली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून विश्वस्त मंडळींच्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत..
संपुर्ण देशात प्रचलित असलेले श्रीक्षेत्र माहूरगड येथील दत्तशिखर हे तमाम महाराष्ट्रासह भारतातील दत्तभक्तांचे श्रद्धास्थान असून प्रभू दत्तात्रयांंचे हे ठिकाण एक पावन तिर्थक्षेत्र असल्याने या पावन तिर्थक्षेत्रावर दरवर्षी हजारो नव्हे, लाखो नव्हे, तर कोट्यावधी भाविक नतमस्तक होण्यासाठी येत असतात. यास कुणीही नाकारू शकत नाही. परंतू याच माहूरगडाच्या दत्तात्र्यय प्रभुंच्या देवस्थानाबद्दल कमालीची अनास्थाच नव्हे तर देवालाही भ्रष्टाचाराने ग्रासले असल्याची प्रचिती देणारा प्रकार पुढे आला असून, श्रीक्षेत्र माहूरगडावरील श्रीदत्तात्र्यय गडाच्या गादीच्या वारसांपैकी एक असलेल्या चिंतामण भारती महाराज यांनी धर्मादाय आयुक्तांसह संबंधित विभागांकडे पुराव्यासह केलेले दावे व तक्रारींमुळे एकच खळबळ उडाली आहे…
श्रीक्षेत्र माहूरगडावरील श्रीदत्तशिखर गडाच्या गादीच्या वारसांपैकी एक असलेल्या चिंतामण भारती महाराज यांनी दत्तशिखर संस्थानच्या सध्या कार्यरत परंतू प्राचीन घटना-नियमावलीत आवश्यक त्या ठिकाणी परिस्थिती व काळानुसार सुधारणा करून पोटनियम व उपकलमे समाविष्ट करावीत, या मागणीसाठी नांदेड येथील मा. धर्मादाय आयुक्त यांचे न्यायदालनात एक चौकशी प्रकरण दाखल केेले आहे. या प्रकरणाचा उद्देश संस्थानची जुनी व विद्यमान घटना रद्द करणे नव्हे तर त्या घटनेतील जुन्या व अर्थबोध न होणा-या काही कालबाह्य मुद्द्दयांचा अर्थबोध होण्यासाठी परिस्थितीप्रमाणे त्यात बदल करून प्रशासनासह विश्वस्थ व विश्वस्थ मंडळाची कार्यप्रणाली ही पारदर्शक व्हावी यासाठी प्रकरण दाखल केले आहे. या प्रकरणातील सर्वात जमेची बाजू म्हणजे सदरील प्रकरण हे संस्थानच्या कारभारात सुशासन, विकासकामांमध्ये शिस्त आणि व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी आवश्यक सुधारणा करण्यासाठी असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असून या प्रकरणात संस्थान किंवा कोणताही व्यक्तीविरोध नाही. परंतू, वादी चिंतामण भारती महाराज यांच्या मागणीचा कल हा सर्वसमावेशक व पारदर्शक तत्वांवर आधारीत व कुणाच्याही विरोधात नसतानाही विद्यमान परिस्थिती पाहता त्यांच्या या न्यायालयीन कृतीसाठी हा विरोध नेमका कशाला.? व कुणाला..?? हा प्रश्न न उलगडणारे कोडे बनले असून, या प्रकरणात कोणत्याही व्यक्तीविरुद्ध वैयक्तिक स्वरूपाचे आरोप करण्याचा उद्देश नसल्याचे वादीच्या संपुर्ण द्याव्यात दिसत असले तरीही या दाव्यामुळे हा वाद नेमका “कोणाविरुद्ध व याचा नेमका विरोधी कोण”…? हा यक्षप्रश्न आता सर्वसामान्यंना भेडसावत असून देवस्थानचा कारभार कोणत्या नियमांनुसार, कोणत्या जबाबदारीने आणि किती पारदर्शकतेने चालला पाहिजे..? या मूलभूत प्रश्नांची व सुरू असलेल्या एकूणच घडामोडींच्या पडद्यामागील अनाकलनीय विषयांची होत आहे. त्यामागे व त्याकडे कोण कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो..? हे तपासण्याची सद्यातरी गरज नसली तरीही संपुर्ण भारतभर प्रचलित असलेल्या या प्रसिद्ध देवस्थानाच्या पडद्यामागील कारभाराची चौकशी होवून त्यामागचे खरे सत्य आता सर्वांसमोर येण्याची गरज निर्माण झाल्याचे दिसून येत आहे…
देवस्थानचे महंत महाराज व महाराजांचे धार्मिक स्थान, पूजा-अर्चा, आरती, सण-उत्सवातील धार्मिक विधी, रूढी-परंपरा आणि देवस्थानच्या धार्मिक स्वरूपाशी संबंधित अधिकारांचा सन्मान राखतानाच संस्थानच्या प्रशासकीय व आर्थिक व्यवहारांसाठी स्पष्ट नियम असावेत, हा या मागणीमागील प्रमुख मुद्दा असल्याचे सांगण्यात येत असून या मागणीचे फलीत म्हणून समोर आलेल्या चिंतामण भारती महाराज यांच्या राहत्या घराच्या ताब्याचा मुद्दा आता ऐरणीवर नव्हे तर चव्हाट्यावर आला अशीच परिस्थिती आहे…तथापि, न्यायालयातील प्रकरण सुरू असतानाच आता चिंतामण भारती महाराजांनी काल दि. ५ ऑक्टोबर २०२६ रोजी माहूर तहसीलदारांकडे स्वतंत्र अर्ज करून आपल्या राहत्या घरात अनधिकृत प्रवेश अथवा हस्तक्षेप करू नये, अशी मागणी केली आहे. या अर्जात न्यायालयीन प्रकरण क्र. १४३३/२०२५ सक्षम न्यायालयात प्रलंबित असल्याचे नमूद करण्यात आले असून दि. ५ ऑक्टोबर रोजी संबंधित वाद आपसी समझोत्याने निकाली काढण्याचा प्रयत्न झाल्याचा उल्लेखही करण्यात आला आहे. तर संबंधित महापुरुषांच्या अनुपस्थितीमुळे तो समझोता होऊ शकला नसल्याचे अर्जदाराने म्हटले असून त्यामुळे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना न्यायालयाचा आदेश किंवा कायदेशीर प्रक्रिया नसताना कोणत्याही व्यक्तीने चिंतामण भारती यांच्या राहत्या घराचे दार अथवा कुलूप उघडणे, घरात प्रवेश करणे किंवा ताब्यात हस्तक्षेप करणे करू नये, अशी स्पष्ट मागणी तहसीलदारांकडे चिंतामण भारती महाराज यांनी केली आहे.
“विशेष म्हणजे “माझ्या कायदेशीर हक्कांचे व शांततापूर्ण ताब्याचे संरक्षण करा”.. आपल्या कायदेशीर हक्कांचे तसेच शांततापूर्ण ताब्याचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, अशी विनंती चिंतामण भारती महाराजांनी लेखी निवेदनाद्वारे माहूर तहसीलदारांना केली आहे. त्यात त्यांच्या राहत्या घराला टाळे ठोकण्यात आल्याचा आरोप या प्रकरणाला अधिक गंभीर स्वरूप देणारा ठरत असून, हे टाळे नेमके कोणी, कोणत्या अधिकाराने आणि कोणत्या परिस्थितीत लावले..? याची अधिकृत वस्तुस्थिती अद्याप स्पष्ट होणे बाकी आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करणे आवश्यक ठरणार आहे… तथापि, एका बाजूला संस्थानच्या घटना-नियमावलीत दुरुस्ती-सुधारणेसाठी धर्मादाय न्यायालयातील लढाई सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला आपल्या राहत्या घराच्या ताब्याचे संरक्षण करण्यासाठी चक्क तहसीलदारांकडे धाव घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे संस्थानच्या कारभारातील पारदर्शकतेचा प्रश्न आता केवळ कागदोपत्री राहिलेला नसून, तो वैयक्तिक हक्क, ताबा आणि प्रशासनाच्या भूमिकेपर्यंत पोहोचला आहे का..? हा सवाल आता सर्वश्रुत बनला असून, १) न्यायालयीन प्रकरण प्रलंबित असताना संबंधित पक्षाने स्वतःहून कोणताही हस्तक्षेप करणे कायदेशीरदृष्ट्या योग्य आहे का..? २) राहत्या घराला टाळे लावण्यात आले असल्यास ते कोणी आणि कोणत्या अधिकाराने लावले..? ३) संस्थानच्या धार्मिक गादीचा सन्मान कायम ठेवून प्रशासकीय व आर्थिक कारभारासाठी अधिक पारदर्शक आणि उत्तरदायी नियम करण्याच्या मागणीवर धर्मादाय न्यायालय काय निर्णय देते..? या तीन प्रश्नांची उत्तरे आता प्रशासन आणि न्यायालयीन प्रक्रियेतूनच स्पष्ट होणार आहेत. त्यामुळे दत्तशिखर संस्थान हे भाविकांच्या श्रद्धेचे केवळ केंद्र नाही तर संस्थानच्या कारभाराबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांकडे व्यक्तीगत संघर्ष म्हणून पाहण्याऐवजी श्रद्धेच्या दृष्टीने संस्थेचा कारभार नियम, पारदर्शकता, जबाबदारी आणि कायदेशीर चौकटीत कसा राहील, यावर चर्चा होणे आता गरजेचे आहे. त्यामुळे चिंतामण भारती महाराजांनी उपस्थित केलेले प्रश्न योग्य की अयोग्य, त्यांच्या मागण्या योग्य की अयोग्य, याचा अंतिम निर्णय संबंधित न्यायालय व सक्षम प्राधिकरण घेतीलच..! मात्र न्यायालयात प्रकरण प्रलंबित असताना कायदा हातात घेण्याऐवजी न्यायालयीन प्रक्रियेचा मार्ग स्वीकारला जावा, हीच या संपूर्ण वादातून पुढे येणारी अपेक्षा आहे… परिणामी दत्तशिखरच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी करणाऱ्या चिंतामण भारती महाराजांच्या एकेरी लढ्याला न्यायालयीन प्रक्रियेत काय दिशा मिळते आणि त्यांच्या राहत्या घराच्या ताब्याबाबत तहसीलदार प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे माहूरकरांसह दत्तभक्तांचे लक्ष लागले आहे…





