क्राइम
घरकुलाच्या फाईलवर सह्या की घराचा सौदा..? “माहूरच्या अँट्रोसिटी विरूद्ध विनयभंग प्रकरणात रंजक माहिती समोर..!”
दिव्यांग महिलेच्या खात्यावरील घरकुलाचा निधी थेट आरोपीच्या खात्यात ट्रान्सफर ; खरेदीखत आरोपीच्या पत्नीच्या नावे त्यावर नगरपंचायत कर्मचाऱ्याची साक्षी..!

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
(बाबाराव कंधारे)
किनवट/माहूर
माहूर येथील रमाई घरकुल योजनेशी संबंधित प्रकरणात आता खरेदीखत, घरकुलाचा शासकीय निधी, बँक व्यवहार, दोन गुन्हे आणि नगरपंचायत कर्मचाऱ्यांची भूमिका हे सर्व मुद्दे एकमेकांशी जोडले जात असल्याने प्रकरण अधिकच गंभीर बनले असून उपलब्ध माहितीनुसार, गु.र.नं. 186 मधील फिर्यादी दिव्यांग महिला नंदा भिमराव पाईकराव यांच्या अज्ञानाचा फायदा घेत, “घरकुलाच्या फाईलवर सह्या करायच्या आहेत” असे सांगून त्यांच्याकडून विविध कागदपत्रांवर सह्या घेवून 9 ऑक्टोबर 2024 रोजी खरेदीखतातील संबंधित मालमत्ता यातील आरोपीच्या पत्नीच्या नावावर खरेदी करण्यात आल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.
माहूर पोलीस स्टेशन नंदा भिमराव पाईकराव यांनी दिलेल्या फिर्यादीमधील दाखल केलेल्या गुन्ह्यात आता रंजक माहिती समोर येत असून नवनवीन बाबी आता समोर येत असल्याने आरोपींनी कशा प्रकारे पिडीतेला छळून व तिची फसवणूक केेे हे आता कागदोपत्री पुढे आले आहे. पिडीतेला खरेदीखत केलेली महिला म्हणजेच पतीवर पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसरा विनयभंग व चोरीचा आरोप लावून गुन्हा दाखल केलेली पहिल्या प्रकरणातील आरोपीची पत्नी असल्याचे पुढे आले आहे.. तर या खरेदीखतावर साक्षीदार म्हणून चक्क नगरपंचायतचा कर्मचारी असल्याने हा संपुर्ण प्रकार संघटित व नियोजनबद्ध गुन्हेगारीची चाहूल देत आहे…
या संपूर्ण प्रकरणातील सर्वात गंभीर प्रश्नांपैकी एक म्हणजे खरेदीखत क्र. 864/2024 वर साक्षीदार म्हणून सह्या करणाऱ्या दोन व्यक्ती या माहूर नगरपंचायतीचे कर्मचारी व संबंधातील असल्याची माहिती समोर आल्याने हा केवळ योगायोग म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही. कारण, एका बाजूला नगरपंचायतीशी संबंधित रमाई घरकुल योजना, दुसऱ्या बाजूला त्याच लाभार्थ्याच्या मालमत्तेचा खाजगी खरेदी-विक्री व्यवहार, आणि त्या व्यवहाराच्या दस्तऐवजावर नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या साक्षी..? या तिन्ही बाबींची स्वतंत्र चौकशी होणे आवश्यक असून नगरपंचायत कर्मचारी हे त्या दस्तऐवजावर कोणत्या भूमिकेत साक्षीदार झाले..? त्यांना व्यवहाराची पूर्वकल्पना होती का.? ते संबंधित महिलेला ओळखत होते का..? घरकुलाच्या कागदपत्रांवर सह्या आणि खरेदीखतावर सह्या यामध्ये काही संबंध होता का.. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्यांनी साक्षीदार म्हणून नेमके काय पाहिले किंवा त्यांच्या उपस्थितीत काय घडले..? या प्रश्नांची उत्तरे आता पोलीस तपासातून निश्चितच समोर येतील..
खरेदीखतानंतर घरकुलाचा निधी…आणि सुरू झाला पैशांचा प्रवास..!
याच घटनाक्रमाला आता संबंधित बँक खात्याच्या स्टेटमेंटची जोड मिळत असल्याने प्रकरणातील आर्थिक बाजू अधिक महत्त्वाची व ठळक स्वरूपात पुढे येत आहे.. दरम्यान फिर्यादी नंदा भिमराव पाईकराव यांच्या बँक खात्याच्या बँक स्टेटमेंटमध्ये दि. 3 एप्रिल 2025 रोजी “RAMAI GHARKUL YOJNA – 3RD INSTALL” म्हणून ₹60,000 जमा झाल्याचे दिसते. परंतु त्यानंतर अवघ्या दोन दिवसांनी, दि. 5 एप्रिल 2025 रोजी ₹60,000 रक्कम “TRF TO GANESH JADHAV” अशी नोंद असलेल्या व्यवहारातून हस्तांतरित झाल्याचे दिसते… म्हणजेच ‘रमाई घरकुलाचा हप्ता रू ₹60,000 जमा.. दोन दिवसांनी संपूर्ण ₹60,000 — गणेश जाधव यांच्या खात्याकडे Transfer घरकुलासाठी मिळालेली रक्कम दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यात का गेली..? हा आता तपासाचा कळीचा मुद्दा ठरणार आहे… प्रश्न इथेच थांबला नाही तर यापुढे रू. 1.10 लाख जमा… त्याच दिवशी ₹1 लाख बाहेर..! याच खात्यात दि. 29 एप्रिल 2026 रोजी “RAMAI AWAS YOJNA – 4TH INSTALLMENT” म्हणून ₹1,10,000 जमा झाले. आणि त्याच दिवशी ₹ 50,000 – Mohd Toufiq Mohd Hasham आणि ₹ 50,000 Sandip Bhiku Rathod अशा दोन वेगवेगळ्या बँक खात्यावर केलेल्या ट्रान्सफर प्रमाणे एकूण ₹1 लाख रक्कम बाहेर गेल्याचे स्टेटमेंटमध्ये दिसते… यामुळे आता प्रश्न केवळ घरकुल मंजुरीचा राहिलेला नसून, शासकीय घरकुल निधीचा संपूर्ण Money Trail तपासण्याची वेळ आली आहे.
पहिला गुन्हा आणि साडेतीन तासांत दुसरा गुन्हा..!
या प्रकरणातील आणखी एक महत्त्वाचा घटनाक्रम म्हणजे गु.र.नं. 186 दाखल झाल्यानंतर अवघ्या साडेतीन तासांनी गु.र.नं. 187 दाखल होणे. गु.र.नं. 187 मधील फिर्यादी महिला या खरेदीखत क्र. 864/2024 मधील खरेदीदार असल्याचे खरेदीखतावरून सिद्ध झावे आहे. त्यामुळे पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर इतक्या कमी कालावधीत दुसरा गुन्हा दाखल होण्यामागील पार्श्वभूमी काय होती, याचाही तपास होणे गरजेचे असून दुसरा गुन्हा हा पहिल्या प्रकरणाचा परिणाम कमी करण्यासाठी किंवा स्वतःचा बचाव करण्याच्या उद्देशाने दाखल करण्यात आला होता का, की तो स्वतंत्रपणे घडलेल्या घटनेवर आधारित होता..? याचे उत्तर पोलीस तपासातून स्पष्ट होणे अपेक्षित आहे. तथापि, तपासाची दिशा फक्त गुन्ह्यापुरती अपेक्षित नसून ‘दस्तऐवज + घरकुल + पैसा’ या त्रिकोणाची संपुर्ण चौकशी होवून प्रकरणाच्या थेट मुळावर घाव घालणारी हवी… त्यामुळे पोलीसांनी या प्रकरणात समोर आलेले खरेदीखत क्र. 864/2024 खरेदीखतावरील साक्षीदारांच्या सह्या व त्यांची नगरपंचायतमधील पदे.. यासोबतच ‘रमाई घरकुल मंजुरीची संपूर्ण फाईल…लाभार्थ्याच्या नावावर मंजूर झालेले हप्ते.. ₹ 60,000 चा UTR व Transfer details, ₹ 1,10,000 चा UTR व त्यानंतरचे व्यवहार.., संबंधित सर्व खात्यांची KYC माहिती.., पैसे हस्तांतरणाची पद्धत व authentication records… गु.र.नं. 186 आणि 187 मधील तक्रारी व घटनाक्रम.. हे मुलत: तपासण्याची गरज निर्माण झाली आहे…
एकाच प्रकरणात एवढे योगायोग..?
★ 9 ऑक्टोबर 2024 रोजी खरेदीखत क्र. 864/2024, खरेदीदार – सुनिता गणेश जाधव
साक्षीदार – नगरपंचायत कर्मचारी असल्याचा दावा..
★ 3 एप्रिल 2025 रोजी घरकुलाचा ₹60,000 हप्ता जमा, 5 एप्रिल 2025 रोजी ₹60,000 गणेश जाधव यांच्या खात्याकडे Transfer
★ 29 एप्रिल 2026 — रमाई आवास योजनेचा ₹1.10 लाखांचा हप्ता जमा, त्याच दिवशी ₹50 हजार + ₹50 हजार अशा दोन व्यवहारांत ₹1 लाख बाहेर..
★ गु.र.नं. 186 नंतर साडेतीन तासांत गु.र.नं. 187…
आता खरा सवाल…!
* दिव्यांग महिलेच्या अज्ञानाचा फायदा घेऊन घरकुलाच्या नावाखाली घर व जागा हस्तांतरित करण्यात आली का..?
* नगरपंचायत कर्मचाऱ्यांना या व्यवहाराची माहिती होती का.?
* खरेदीखतावर त्यांची साक्ष का घेण्यात आली..?
* खरेदीखतानंतरच घरकुल मंजूर झाले का..?
* घरकुलाचा निधी संबंधित लाभार्थ्याच्या खात्यातून दुसऱ्या व्यक्तींच्या खात्यात का गेला..?
* आणि पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या साडेतीन तासांत दुसरा गुन्हा दाखल होण्यामागे नेमकी पार्श्वभूमी काय..?
या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळेपर्यंत माहूरच्या रमाई घरकुल प्रकरणावर पडदा पडणार नाही. किंबहूंना माहूर नगर पंचायतचे फेरफार रजिस्टर व त्यासंबंधातील कार्यालयीन दस्तावेज, खरेदीखत, घरकुलाची फाईल आणि बँक स्टेटमेंट हे तीन दस्तऐवज एकत्र तपासले तर या प्रकरणातील खरी ‘कहाणी’ निश्चितच समोर येण्याची शक्यता असून पडद्यामागचे सत्य पुढे येणार आहे…त्यामुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत असलेल्या या प्रकरणात माहूर पोलीसांची खरी कसोटी असून एकीकडे राजकीय व आर्थिक अट्टाहास तर दुसरीकडे अन्याय व न्यायासाठी दिव्यांग महिलेचा आर्त टाहो.. या दोन्ही बाजू ख-या अर्थाने समजून व उमजून घेवून पोलीसांनी तपासकार्य करावे अशी माफक अपेक्षा न्यायप्रेमींकडून व्यक्त होत आहे…





