सामाजिक
सिंदखेड पोलीसांची अशीही सामाजिक बांधिलकी.! घडविले माणुसकीचे दर्शन..!!
चहाटपरीवरील खुर्चीवर बेवारस सापडलेला सव्वालाखांचा मुद्देमाल वृध्द महिलेला केला सुपुर्द...
(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
बेवारस सापडलेल्या बटव्यातील सव्वा लाखांचा मुद्देमाल परत करताना सिंदखेड पोलीसांनी आपल्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवून एक आदर्श घडवाला असून पोलीसांच्या या कृतीचे सामाजिक स्तरातून प्रचंड अभिनंदन होत आहे…
आज दि. २२ रोजी माहूर तालुक्यातील मौजे वाई बाजार येथे माकप नेत्या वृंदा करात यांच्या छोटेखानी स्वागत समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्याच्या कामानिमित्त किनवट येथील होमगार्ड पथकाचे कर्मचारी सचिन म्याकलवार यांच्यासह ज्ञानेश्वर सुर्यवंशी, मधूकर जाधव,एन.एन. जुनगरे व विजय दासरवार हे बंदोबस्तकामी हजर होते. दरम्यान वाई बाजार येथील फाट्यावर चहाच्या एका टपरीवर त्यांना एक बटवा आढळून आला.. तो बटव्यात पाहिले असता त्यात दोन तोळे सोने व ५४०० (पाच हजार चारशे) रूपये दिसून आले. उपस्थित कर्मचा-यांनी सदर बाब डिएसबी पवार यांना सांगितली. दरम्यान सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक सुशांत किनगे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बटव्यात सापडलेल्या एका पावतीवरून तो बटवा मौजे मलकागुडा येथील चंद्रभागाबाई मोहिते या ८१ वर्षीय वृ्ध महिलेचा असल्याचे समजले.
विशेष म्हणजे सदरील वृद्ध म्हातारी डोळ्याच्या ऑपरेशनसाठी तिच्या मुलीला सोबत घेवून यवतमाळ येथील दवाखाण्यात जात असताना वाई बाजारपासून माहूरपर्यंत निघूनही गेली होती. तर माहूर येथे पोचल्यानंतर बटव्या गायब असल्याचे समजताच मायलेकींनी रडणेही सुरू केले होते. तेवढ्यात सिंदखेड पोलीसांनी फोन करून बटवा सापडल्याची माहिती देताच दोघीही परत वाई बाजार फाट्यावर आल्यानंतर सहायक पोलीस निरिक्षक सुशांत किनगे व सहकारी कर्मचारी तसेच ग्रामस्थांच्या उपस्थितीत सदरचा बटवा त्या वृध्द म्हातारीला सुपूर्द करण्यात आला.. यावेळी म्हातारी व तिच्या मुलीच्या डोळ्यांत आवंदाश्रू वाहत होते.. तर पोलीसांचे मनापासून आभारही मानत होते..
एकंदरीतच आपल्या सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण देत सिंदखेड पोलीसांनी एक नवा आदर्श समोर ठेवून माणुकीचे दर्शन घडवल्याने सिंदखेड पोलीसांचे प्रचंड कौतुक व अभिनंदन होत आहे…