नोकरी संदर्भ
भर पावसात तब्बल विस गावांच्या पिक नुकसानीची पाहणी पूर्ण ; महसूल विभागाच्या कार्यतत्परतेचे शेतक-यांंतून समाधान…
"पिक नुकसानीचा प्राथमिक अहवाल शासनाकडे सादर.."
(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
किनवट/माहूर
भर पावसात तालुक्यातील तब्बल विस गावांच्या पिक नुकसानीची पाहणी करणा-या महसूल विभागाच्या कार्यतत्परतेचे शेतकरी बांधवांकडून कौतुक होत असून पिक नुकसानीचा प्राथमिक अहवाल शासनाकडे सादर केला असल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आले आहे…
संपुर्ण जिल्ह्यासह माहूर तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून ढगफुटी सदृष्य पाऊस पडत असल्याने पैनगंगा नदी पात्र दुथडी भरून वाहत आहे. अशात पुलावरून पाणी गेल्याने खेड्यापाड्यातून नदीला मिळालेले सर्व नाले काठोकाठ भरले असून याचाच परिणाम म्हणून पाणी शेतात गेलेल्या पाण्याने संपूर्ण जमीन खरडून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यासह किनवटच्या सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांच्या आदेशानुसार माहूरचे तहसीलदार किशोर यादव व महसूली कर्मचा-यांनी भर पावसात माहूर तालुक्यातील वानोळा सर्कलसह वाई बाजार सर्कल मधील तह्बल वीस गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांच्या पिक नुकसानीची पाहणी केली. यातून पाहणी केलेला प्राथमिक अहवाल शासनाकडे सादर केल्याची माहीती महसूल विभागाकडून प्राप्त होत असून त्यांच्या या कार्यतत्परतमुळे नागरिकांसह शेतकऱ्यातून महसूल विभागाचे अभिनंदन होत आहे…
माहूर तालुक्यातील 62 गट ग्रामपंचायत अंतर्गत शंभर पेक्षा जास्त गावे असून ही सर्व गावे अतिदुर्ग डोंगर द-या खोऱ्यात वसलेली आहेत. अनेक ठिकाणी जाण्यासाठी रस्ते नसताना पडलेल्या पावसामुळे नुकसानीची माहिती मिळाल्याने तहसीलदार व महसूली कर्मचा-यांनी भर पावसात आपल्या सहका-यांसमवेत वाई बाजार सर्कलमधील अनेक गावासह हडसणी ईवळेश्वर कुपटीसह अनेक गावांना तात्काळ भेटी देऊन प्रत्यक्ष चिखल असलेल्या शेतात जाऊन नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांना धीर दिला.. तसेच ज्या गावात भेटी दिल्या त्या गावातील सरपंच पोलीस पाटील तसेच सर्व कर्मचाऱ्यांना सावधानतेच्या इशारा देत नुकसानीची परिपूर्ण माहिती देण्याचे आदेशित केले..
माहूर तालुक्यातील खेड्यापाड्यात जाणाऱ्या अनेक रस्त्या वर असलेल्या पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाल्याने अनेक पूल खरडून गेले असून इवळेश्वर मार्गावरील फुल खरडून गेल्याने रस्ता बंद झाला होता त्याची पाहणी करून त्याचाही अहवाल वरिष्ठाकडे पाठविला असून पोळ्याच्या दिवशीही घरी न थांबता तहसीलदारासह महसूल कर्मचा-यांनी खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करून प्राथमिक अहवाल शासनाकडे सादर केला असून सर्व मंडळ अधिकारी तलाठ्यांसह सर्व विभागांच्या कर्मचाऱ्यांना सावधानतेचा इशारा देत अलर्ट राहण्याच्या सूचना केल्या आहेत. कुठल्याही प्रकारचे नुकसान झाल्यास तात्काळ माहिती देण्याचेही नागरीकांना सांगण्यात आले आहे..