ईतर

माहूर तालुक्यातील पैनगंगा नदीपात्रालगत अवैध रेती वाहतूक पुन्हा तेजीत….!

"सायफळ, पडसा सह अनेक ठिकाणी रेतीचे ढिगारेच ढिगारे ; अपवादात्मक कारवाया वगळता महसूल विभागाचे दुर्लक्ष"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)

 

 

 

 

 

किनवट/माहूर
मागील काही दिवसांपासून थंड पडलेल्या अवैध रेती वाहतुकीने सहायक जिल्हाधिका-यांची बदली होताच पुन्हा डोके वर काढले असून संपुर्ण माहूर तालुक्याच्या पैनगंगा नदीपात्राशेजारील भागात पुन्हा एकदा रेतीतस्करांना सुगीचे दिवस आल्याचे चित्र दिसून येत आहे. तर एकीकडे किरकोळ कारवाया तर दुसरीकडे रेती तस्करीची अनेक वाहने तालुक्यातील मुख्य महामार्गावरून बिनदिक्कतपणे धावताना पाहून काही रेती तस्कर व संबंधित विभागाचे छुपे संबंध उघड होताना दिसून येत आहे..

 

   किनवटचे तात्कालिन सहायक जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांच्या धडक कारवायांनी मागील काळात अवैध रेतीतस्करीला कमालीचा लगाम लागला होता. परंतू नुकतीच त्यांची बदली झाल्याने माहूर तालुक्यातील रेती माफीया पुन्हा एकदा सक्रीय झाल्याचे दिसून येत आहे. तथापि तालुक्यातील सर्वच नदी घाटांवर पैनगंगा नदी पात्रानजीक जागोजागी रेतीसाठे करण्याचा धडाका सुरू असून नदीशेजारी असलेले सायफळ, वडसा, पडसा, टाकळी, लांजी तसेच अनेक ठिकाणी रेतीतस्कर रातोरात रेतीचे ढिगारेच ढिगारे उभे करत असल्याचे बोलके चित्र दिसून येत आहे.. विशेषत: माहूरसह टाकळी,नेर, लिंबायत, वडसा, पडसा, गोकुळ, सायफळ, मदनापूर, हरडप, वाई बाजार, बोंडगव्हाण, चौफुली, सावरखेड, नाईकवाडी, अंजनखेड, सिंदखेड, लोकरवाडी ते थेट उनकेश्वर पर्यंत पैनगंगा नदीपात्रालगतच्या अनेक ठिकाणी भरमसाठ रेतीसाठे केल्या जात असून अगदी बिनदिक्कतपणे होत असलेल्या या ‘रेतीनाट्यास’ महसूल व पोलीस विभाग अर्थपुर्ण संबंधातून छुपा पाठींबाच देत असल्याची प्रचिती एकंदरीत परिस्थितीवरून दिसून येत आहे. तर उपलब्ध संधीचा लाभ उठवत तालुक्यातील सर्व ठिकाणचे रेतीतस्कर पुन्हा एकदा हरकतीत आले असून रेती तस्करांना मात्र ‘अच्छे दिन’ आले असल्याचे बोलके चित्र सध्या रेती तस्करांच्या भरधाव वेगात धावणा-या वाहनांवरून दिसून येत आहे.

 

विशेष म्हणजे माहूर तालुक्यातील सायफळ (कोळी) परिसरात रेती डेपो प्रस्तावित असून त्याबाबतचे काम प्रगतीपतावर आहे. तर अवघ्या काही दिवसात सदरचा रेती डेपो सुरू होणार असल्याची माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.. अशात डेपो सुरू झाल्यानंतर आपले ‘चांगभले’ होईल की नाही..? या विचारात उपलब्ध वेळेत संधीचे सोने करण्याच्या उद्देशाने जवळपास सर्वच रेतीतस्कर हरकतीत आले असून आठवड्यातील शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवसांचा पुरेपुर फायदा घेत रेतीतस्कर आपली ‘सुगी’ करून घेतांना दिसत आहेत..

 

याकडे संबंधीत यंत्रणा मात्र हेतूपूरस्सर दुर्लक्ष करीत असून केवळ औपचारिक स्वरूपाच्या कारवाया वगळता महसूल विभागाकडून अद्यापही मोठ्या स्वरूपाची कारवाई होत नसल्याने रेतीतस्करांसोबत अर्थपुर्ण संबंधातून संबंध तर नाही ना..? असा यक्षप्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे… एकंदरीतच रेतीतस्करांकडून जागोजागी उभ्या केलेल्या खब-यांकडे पाहता अवैध रेती तस्करीची वाहने बिनदिक्कतपणे जात असल्याने महसूल विभाग जाणिवपुर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा अनेकांचा दावा आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष देतील काय ? हा यक्षप्रश्न सर्वसामान्यांना भेडसावत असला तरी ग्रामीण भागातील अवैध रेती वाहतूकीवर आळा घालण्यासाठी स्वत: जिल्हाधिकारी कार्यालयाने पुढाकार घेवून या बाबीकडे लक्ष केंद्रीत करण्याची गरज निर्माण झाली आहे….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close