ईतर
माहूर किनवट तालुक्यात पत्रकारांचे भन्नाट पिक.? पिडीएफ् पेपर अन् मोबाईल न्युज वर्जनचे थैमान..!!
"कॉन्ट्रॅक्ट किलींग प्रकाराला साजेशी कॉन्ट्रॅक्ट पत्रकारीता सुरू..." "दारूवाला, मटकेवाला, गुटखेवाला, रेतीवाला, पंम्चरवाल्यासह ऑटोवाला अन् 'नथनी'वालाही पत्रकार..??"

(महाराष्ट्र न्युज नेटवर्क)
(बाबाराव कंधारे)
किनवट/माहूर
लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारीतेला किनवट माहूर तालुक्यात लालसेचे ग्रहण लागल्याने चक्क दोन नंबरवाली मंडळीही आपले काळेधंदे पत्रकारीतेच्या पदराखाली पांढरे करण्यासाठी अवतरली असून पिडीएफ् पेपर अन् मोबाईल न्युज अँप्लीकेशनच्या वर्जनचे थैमान पाहता दारूवाला, मटकेवाला, गुटखेवाला, रेतीवाला, पंम्चरवाल्यासह ऑटोवाला अन् नथनीवालाही पत्रकार झाल्याच्या बड्या बाता मारून सोशल मिडीयावर कॉपी पेस्ट बातम्यांचे प्रदर्शन भरवत असल्याने लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आता ‘बे-आधार’ होवून ‘कॉन्ट्रॅक्ट किलिंग’ प्रमाणेच ‘कॉन्ट्रॅक्ट प्रसिध्दी’ चे “ठेके” घेताना दिसून येत आहे…
“लोकशाहीच्या चौथ्या आधार स्तंभाचे प्रतिनिधीत्व करणारे प्रतिनिधी अर्थातच ‘पत्रकार’..! ही एक अशी व्यक्ती आहे जी समाजात घडणा-या घटना, माहिती आणि घडामोडी गोळा करून त्यावर प्रतिक्रिया देवून त्यारूपातील वृत्तांकन वृत्तपत्र, रेडीओ, टेलीव्हिजन किंवा सोशल मिडीया यासारख्या माध्यमांतून लोकांपर्यंत पोहोचवते. त्यामुळे पत्रकारास समाजाचे ‘कान-नाक-डोळा’ म्हटले जाते. कारण पत्रकारीतेत चालू घडामोडींसोबतच शोध पत्रकारीता यासारख्या विशेष वृत्तप्रकाराचा समावेश असल्याने यातून प्रसिद्ध झालेल्या गंभीर विषयांची सखोल चौकशी देखील केली जाते…
परंतू, किनवट व माहूर तालुक्यात पत्रकारीतेची पातळी अत्यंत रसातळाला गेलेली दिसत असून तालुक्यातील लेखणीधारक पत्रकारांच्या लेखनीने पत्रकारीता जिवंत ठेवणा-या काही निवडक पत्रकारांच्या लेखणीचे सौंदर्य आणि मान सन्मान पाहून दोन्ही तालुक्यातील दोन नंबरवाली मंडळी देखील आता पिडीएफ् पेपर, मोबाईल न्युज अँप व सोशल प्लॅटफॉर्मच्या ब्लॉगचे ओळखत्रे गळ्यात अडकवून पत्रकार झाल्याचा आव आणत वणवण फिरताना दिसून येत आहेत.. ज्यात प्रामुख्याने ‘आमच्या बातम्या छापत नाहीत म्हणून मी पण पत्रकार झालो. असे म्हणणा-या मंडळीसोबतच दारूवाला, मटकेवाला, गुटखेवाला, रेतीवाला, पंम्चरवाल्यासह ऑटोवाला अन् ‘नथनी’वालाही पत्रकार झालेला दिसत असून पत्रकारीतेच्या पदराखाली दोन नंबरचे काळे धंदे पांढरे करण्याचा केवीलवाणा प्रयत्न करताना दिसत आहे… विशेषत: या सर्व कॉपीपेस्ट ‘फकाटांना’ प्रसिद्धीचा कॉन्ट्रॅक्ट घेतल्याप्रमाणे काही व्हाईस टायपिंगवाली मंडळी कॉपीपेस्ट व आयत्या बातम्या पुरवत असल्याचे भयान वास्तव समोर आले असून बातमीचा ‘इंट्रो’ कशाला म्हणतात..? हे देखील माहिती नसलेली आयतखाऊ, कॉपीपेस्ट व स्वयंघोषित पत्रकार मंडळी आता ‘स्वत:ची’ झाकून ठेवण्यासाठी लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाला खिळखिळी करताना दिसून येत आहे..
विशेष म्हणजे दोन्ही तालुक्यातील समाजमाध्यमांवरील हजारो वॉटसअप ग्रुपवरील ग्रुप मेंबरनी अवलोकन केल्यास काही निवडक वृत्तांकन वगळले तर शेकडो पिडीएफ् पेपर, न्युज पोर्टल, यु-ट्युब चैनल तसेच मोबाईल वर्जन अँपवरील जवळपास सर्वच्या सर्व बातम्यांतील मजकूर ‘समसमान’ म्हणजेच “कॉपी पेस्ट” असतो. अगदी एखादी क्षुल्लक चुक देखील दुरूस्त करण्यापेक्षा ती चुक दुरूस्त कशी करायची..? याचीही अक्कल या कॉपी पेस्ट वाल्या बोगस रत्रकारांना नाही.. हे कुणीही नाकारू शकत नाही. परिणामी बातमीचा खरेपणा किती..? याबाबत भ्रामक प्रश्नांना पेव फुटले असून सर्वसामान्यांच्या मनात आजची पत्रकारीता ‘आरोपीच्या पिंज-यात’ उभी असल्याप्रमाणे संशयाच्या भोव-यात आहे.. त्यामुळे केवळ काळ्या धंद्यांना पाढरे करण्यासाठी पत्रकारीतेला बचावाचे साधन बनवणा-या तथाकथीत बोगस व कॉपीपेस्ट तसेच लिखाणकौशल्याची कोणत्याही प्रकारची अक्कल नसलेल्या स्वयंघोषित ‘फकाट’ पत्रकार मंडळीवर आळा घालणे ही काळाची गरज असून हल्लीच्या समाजमाध्यमांवरील कॉपीपेस्ट वृत्तांकनावर कडक कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक नांदेड यांनी स्वत: पुढाकार घेवून बोगसगीरी करणा-या सर्व मंडळीवर कॉपीराईट कायदा १९५७ नुसार कारवाई करावी.. अशी माफक अपेक्षा वाचक व लेखणीधारक पत्रकार मंडळींकडून होत आहे….





